Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नुसती निष्ठा नसून तो त्यांचा धंदाही आहे. धर्म हा जेव्हा धंदा होतो तेव्हा धार्मिक अन्याय हेच काही जणांच्या जगण्याचे साधन असते. अशा वेळी जर शोषक आपल्या आर्थिक गरजांच्यासाठी अन्यायाला न्याय म्हणू लागले व त्याचे संरक्षण करू लागले तर ते स्वाभाविक नाही का? शास्त्रीबुवांचे महाजनांनी रंगविलेले स्वभावचित्र स्वभावरेखन म्हणून कसे आहे हे सांगणे म्हणजे काव्यनिकषावर मूल्यमापन करणे होईल. ते रसिकांनी करावे. त्यात खाचाखोचा भरपूर आहेत एवढेच माझे म्हणणे.

 भक्तिरसाने ओतप्रोत तुडुंब झालेल्या रामचरित मानसाच्या प्रवेशानंतर कळवळ्याने सामाजिक उणिवांचे मर्मदर्शन करणारे महाजन या खण्डकाव्याच्या द्वारे रसिकांसमोर प्रवेश करीत आहेत. प्रस्तावना-लेखकाचे काम शिट्टी मारून पडदा वर उचलणे इतकेच आहे. हे काम कविवर्यांना जर अरोचक झाले असेल तर उदार मनाने त्यांनी प्रस्तावनेची उपेक्षा करून मला क्षमा करावी व रोचक झाले असेल तर प्रेमाने कौतुक करून आशीर्वाद द्यावा, हीच विनंती.

मोत्याची मागणी । १९