याचा दोष फार तर महाजनांना संस्थानात राहायचे होते यावर जाईल हेही ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे.
कविवर्य दे. ल. महाजन यांच्या काव्याचे काव्य म्हणून मूल्यमापन करतो हे या प्रस्तावनेचे कार्य नव्हे. महाजनांच्यावर अन्याय जर होऊ द्यायचा नसेल तर सहृदयांनी काय काय ध्यानात ठेवणे आवश्यक आहे हे सुचविण्याचे आहे या परिस्थितीत स्वभावरेखन म्हणून विश्वंभर शास्त्रीबुवांचा परिचय करून घेणे मौजेचे ठरेल. भिक्षुकवर्गाशी महाजनांचा परिचय फारच दाट असल्यामळे हे स्वभावचित्र फार खाचाखोचांनी भरलेले आहे. दरिद्यासारखा राहणारा हा भट चांगलाच संपन्न आहे; कारण भिक्षुकीच्या व्यवसायांत द्रव्य दरिद्रतेचा पडदा आड धरूनच साठत असते. श्रमजीवी वर्गान श्रमातून उत्पन्न केलेले धान्य जनतेचा भोळा भाव म्हणून व भटजीचा धंदा म्हणून त्यांच्या घरी चालत येते. शास्त्रीबुवा दक्षिणेशिवाय नावनक्षत्र पाहत नाहीत. व्याजाशिवाय पैसा देत नाहीत. सात शेर सोळा तोळे सोने घरी असणारा हा माणूस; पण दळण बायकोच्या नशिबी असतेच! कर्ता मुलगा मरतो; पण जास्त खर्च नको म्हणून शास्त्रीबुवा बायकोला भेटीसाठी आणीत नाहीत. चोरांनी घर लुटल्याचे कळताच त्यांचा पुत्रशोक मागे पडतो. पत्नीचा मृत्यू होताच तिच्या क्रियाक्रर्माबरोबर सुनेचे केशवपन ते उरकून टाकतात. कारण खर्चात खर्च निघतो आणि सकेशा सून घरी ठेवणे म्हणजे धंद्याच्या दृष्टीने न परवडणारा अधर्म. हरवलेले धन सापडताच पूजा सोडून ते धावत येतात. त्यांच्या मनात आनंद मावत नाही; पण त्याही वेळी फलज्योतिष शास्त्राचे महत्त्व ते सांगत असतात. धन सापडवून दिल्यामुळे मोत्यावर ते भलतेच खूश होतात. जे त्याला उपभोगता येणे शक्य नाही ते सारे त्याला देऊ करतात; पण जे त्याला हवे आहे ते मात्र धर्मविरोधी आहे म्हणून देण्याची त्यांची इच्छा नाही. मोत्याने वर्मावर बोट ठेवताच कृतज्ञता विसरून जाऊन हेटाळणीपर्यंत त्यांची मजल जाते. धर्मशास्त्रात कुत्रा मारणे पाप नाही म्हणून कुत्रा मारावा. मांजर मारणे प्रायश्चित्तदृष्ट्या खर्चाचे काम आहे म्हणून मांजर मारू नये ही निर्लज्ज सूत्रे सांगताना त्यांना गैर वाटत नाही. हिंसा आणि मांसाहार ही दोन पातके करणारा बोका त्यांना हंस वाटतो. फक्त मांसाहारी मोत्या मात्र त्यांना कावळा वाटतो. बोक्याचाही त्याना त्रास होतो. पण त्या विरुद्ध 'ब्र' काढण्याची त्यांची ताकद नाही. प्रत्यक्ष मुलाला घात केला आहे हे समजल्यानंतरसुद्धा मोत्याने देवघरात जाऊ नये, खर्चिक मार्जारहत्येचे पाप टळावे याच प्रयत्नांत ते असतात. धर्म हा शाश्रीबुवांचा