दूर करण्याबाबत होत्या तर दुसरीकडे ब्राह्मणांना निदान वादात पिटून काढण हे त्याचे लक्ष्य होते; पण आर्थिक मागासलेपणा ही अडचण वरील दोहींपेक्षा मोठी आहे हे लवकरच ध्यानात आले. बहुलोकसंख्येच्या भारतासारख्या देशात Forced labour ची कल्पना अग्राह्य ठरवून वैभवशाली अर्थव्यवस्थेची निर्मिती करणे अशक्य असल्यामुळे अस्पृश्यांचा आर्थिक मागासलेपणा दूर होण्याचा फक्त एकच मार्ग सध्या तरी दिसतो आणि तो म्हणजे खऱ्याखुऱ्या समाजवादाच्या व्यवस्थेवर जास्तीत जास्त ठसा बसविणे. अस्पृश्यांतील अंतर्गत जातिभेद इतके तीव्र आहेत की, आंबेडकरांनासुद्धा महार समाजाचे नेते या सिमेवर संतुष्ट राहणे भाग पडले आणि या सर्वांपेक्षा ब्राह्मण व हरिजनेतर असलेला बहुजनसमाज या समाजाच्या अग्रगामी असणारा मराठा समाज व त्यांचा नेता असणारा देशमुख-पाटलांचा वर्ग हाच महाराष्ट्रात तरी अस्पृश्योद्धारातला सर्वांत मोठा अडथळा आहे. बहुजनसमाज जागा होताच अर्थसत्तेवर ताबा नसणारा ब्राह्मण समाज सामाजिक परिवर्तनाचा प्रवर्तक अगर प्रतिबंधक म्हणून परिणामशून्य होऊन जातो ही वस्तुस्थिती आहे. महाजनांनी हे खण्डकाव्य जर १९५० च्या सुमारास लिहिले असते तर त्यांचा 'मोत्या' शास्त्रीबुवा जोशी यांच्याशी वाद घालण्यापेक्षा पाटील-देशमुखांशी वाद घालता! आणि १९५८ साली हरिजनांनी हिंदुधर्माचा त्याग करण्याची भूमिका घेताच कदाचित् सनातनधर्माभिमानी महाजन काव्य न लिहिता स्तब्ध बसते. ज्या काळी हे काव्य लिहिले गेले आहे त्या काळी बहुजनसमाज झोपलेला होता. साहजिकच ब्राह्मणवर्गाचे नेतृत्व परंपरागत व सर्वमान्य होते. महाजनांनी हिंदुधर्माचा प्रतिनिधी म्हणून एक भिक्षक रंगविताना १९३२ सालाशी इमान राखले आहे. १९६० साली हा प्रश्न पुरा बदलून गेला याची जबाबदारी त्यांची नव्हे.
'मोत्या' आणि 'बोका' ही प्रतीके वापरल्यामुळे मोत्याचे प्रदीर्घ संभाषण शास्त्रीबुवांनी ऐकलेच पाहिजे अशी अपवादात्मक कृतज्ञेची परिस्थिती निर्माण करणे हे पहिल्या खण्डाचे प्रयोजन आहे आणि बोक्याचा घातकीपणा दाखविणे हा तिसऱ्या खण्डाचा विषय आहे. या प्रयोजनपूर्ण काव्याचा गाभा दुसरा खंड आहे. पहिल्या खण्डाचे स्वरूप विषयप्रवेश व प्रस्तावनेसारखे आहे. तिसऱ्या खण्डाचे स्वरूप अधिक माहिती देणाऱ्या परिशिष्टासारखे आहे. महाजनांना प्रतीक घेण्याची गरज न पडण्याजोगी परिस्थिती जर १९३२ साली असती तर पहिल्या व तिसऱ्या खण्डाचा मजकूर काही दुसराच झाला असता. आहे या परिस्थितीत काव्याचा १/३ भागच मुख्य प्रतिपादनासाठी वापरला जाऊ शकला,