पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काव्यविषयक भूमिकेतून एक प्रश्न उभा राहतो; तो असा की, खण्डकाव्य हा वाङमयीन कृतीचा कलात्मक घाट आहे काय? मी असे मानतो की, काही विशिष्ट जीवनानुभूती विशिष्ट प्रकारच्या घाटांतून अभिव्यक्त होणे सोयीचे जाते. कलावंताला आलेला कलात्मक अनुभव रसिकांच्यापर्यंत जसाच्या तसा पोचता करणे यासाठी वाङमयकृतीचा घाट अभिन्नपणे कलात्मक अनुभवाचा आविष्कार असावा लागतो. असे काही अनुभव आहेत की, जे नाटक या वाङमयीन घाटांतूनच अभिव्यक्त करणे अपरिहार्य असते. खण्डकाव्य हा असा वाङमयीन घाट आहे काय? माझे उत्तर 'नाही' असे आहे.

 दुसरा एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे कलाकृतीचा सारांश अगर त्याच्या अस्तित्वाचे प्रयोजन चार-दोन वाक्यांत सांगता येणे इतके सरळ असते काय? कलाकृतीत जे अभिव्यक्त झालेले असते त्या आशयाचा आणि कलाकृतीचा मी इतका अभिन्न सांधा मानतो की, कुठल्याही कलाकृतीचे सार आणि कुठल्याही कलाकृतीचे सभाष्य विवरण असू शकत नाही, असे मला वाटते. माझ्या म्हणण्याचा अर्थ ताणला जाऊ नये. जो कलात्मक अनुभव रसिकांना पोचता करण्यासाठी कलाकृतीचा आकार निर्माण होतो तो अनुभव कुठल्याही कलाकृतीचे सार अगर भाष्य निवेदन करू शकणार नाही इतकेच मला म्हणावयाचे आहे. अशा परिस्थितीत एखाद्या काव्याचे प्रयोजन एका विशिष्ट मताचा पुरस्कार करणे हे असू शकते काय? असा प्रश्न निर्माण होतो. माझे याही प्रश्नाला उत्तर 'नाही' असे आहे. दारू पिऊ नये, हे सांगण्यासाठी गडकऱ्यांनी कदाचित 'एकच प्याला' लिहावयास घेतला असेलही; पण 'एकच प्याला' ही नाट्यकृती अस्तित्वात असण्याचे समर्थन अगर कारण 'दारू पिऊ नये' हे सांगणारे हे नाटक आहे इतकेच असू शकणार नाही. महात्माजी म्हणत, 'खेड्याकडे परत चला.' खेड्याकडे परत चला हे सांगण्यासाठी गिरीशांनी 'आंबराई' लिहिली. आंबराईमधील सर्व कथानक, प्रत्येक पात्र, कथानकांतील चढ-उतार आणि सर्व महत्त्वाचे प्रसंग यांना 'खेड्याकडे चला' या सत्राचाच फक्त आधार असेल तर 'आंबराई' ही कलाकृती ठरू शकेल काय? कोठल्याही कलाकृतीला असे प्रयोजन असावे काय? या प्रश्नाला पुनः माझे उत्तर 'नाही' असे आहे. श्रीयुत महाजनांनी आपले काव्य १९३२ साली लिहिलेले आहे आणि त्या काव्याकडे पाहण्याची महाजनांची मनोवृत्ती त्याहीपेक्षा जुन्या परंपरेशी अधिक निगडित आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे. प्रयोजन असणारी खण्डकाव्ये महाजनांच्या काळात प्रतिष्ठित होती, रूढ होती. उलट

मोत्याची मागणी / १३