पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्फुट काव्यांच्यापेक्षा खण्डकाव्य आणि अप्रयोजनवती कवितेपेक्षा प्रयोजनप्रसवा हीच जास्त प्रतिष्ठित होती. त्या काळातले एक टीकाकार माडखोलकर यांनी यशवंत व माधव जलियन यांच्या संदर्भात गिरीशांना महाकवी ठरविले ते खण्डकाव्याच्याच आधारावर. तेव्हा काळाचा विसर पडताच महाजनांवर अन्याय होण्याचा संभव आहे.

 १९३२ साली अस्पृश्यांचा प्रश्न जागृतीच्या शिखरापर्यंत जाऊन पोचलेला होता. महात्माजींच्यासारखे देशाचे सर्वश्रेष्ठ नेते या प्रश्नावर आपली सर्व प्रतिष्ठा इरेला घालीत होते. खुद्द अस्पृश्य समाजातून बुद्धिमत्तेने स्पृश्यांनाही दरारा वाटावा असा महापुरुष आंबेडकरांच्या रूपाने निर्माण झाला होता. देशभर सर्वत्र हरिजनांच्या प्रश्नाची चर्चा होत होती. अशा या अवस्थेत रूपकाचा आश्रय घेऊन काव्य करणे याचे समर्थन करता येणार नाही. कोणी जर असे म्हणेल की, फूल उघडे दिसण्यापेक्षा पानांच्या आड दडलेले पाहणे रसिकांना जास्त आवडते, तर ते म्हणणे टिकणारे नाही. एक तर या काव्याचे प्रयोजन आनंद नसून प्रबोधन आहे. दुसरे म्हणजे रूपके अगर प्रतीके कधीच कुठल्याही प्रश्नांची सर्वांगीण साम्यता दाखवू शकत नाहीत. कुत्रा हे प्रतीक लाचार आणि दीन अस्पृश्यांना कितीही फिट्ट बसले तरी कुत्र्याच्या अंगी असणारा इमानदार, धनी संरक्षणाचा गुण अस्पृश्यांच्या अंगी आहेच याला इतिहासांत पुरावा नाही.

 भारतीय इतिहासांत हिंदुधर्मावर ज्या ज्या वेळी आघात झाला तेव्हा तेव्हा हिंदुत्वाचे संरक्षण अस्पृश्यांनी छातीचा कोट करून केल्याचे आढळत नाही. ज्या हिंदुधर्माने हजारो-हजार वर्षे अस्पृश्यांच्या संपूर्ण समाजावर फक्त अन्यायच केला त्याचे संरक्षण करण्याची अस्पृश्यांच्यावर नैतिक जबाबदारीही नाही आणि धर्मसंरक्षण सर्व जातीजमातींचे, राष्ट्रीय परंपरांचे प्रत्याघातापासून संरक्षण करण्याइतकी प्रबुद्धताही अस्पृश्य समाजात नव्हती. तिसरे म्हणजे बोध हे ज्या काव्याचे मुख्य लक्षण त्या काव्याने शक्य तितके स्पष्ट व प्रभावी असले पाहिजे; पण ज्या निझामी राजवटीत महाजन राहत होते, त्या राजवटीचे विस्मरण होता उपयोगी नाही. मागासलेल्या, जातवारीने विभागलेल्या अंधश्रद्ध भारत देशात प्रतिगामीपणा, जातीयता, मागासलेपणा यांचे हैदराबाद संस्थान सर्वोच्च केंद्र होते. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ज्योतिबांपासून अस्पृश्योद्धाराच्या चळवळीची परंपरा आहे, चिपळूणकरांच्यापासून शैक्षणिक उत्थापनाचा व सार्वजनिक सभेपासून राजकीय जागृतीचा वारसा आहे तसा या संस्थानात

 

१४ / थेंब अत्तराचे