सुचविण्यात येत असतानाही निवडणूक टाळण्याची त्यांची प्रवृत्ती हा बहूमान सतत दूर ढकलीत होती. शेवटी महाजनांच्या कर्तृत्वाचा गौरव हा की, मराठवाड्यांतील सर्व महत्त्वाच्या साहित्यिकांनी उद्गीर-संमेलनाच्या वेळी महाजनांच्याखेरीज दुसरे नावच सुचवावयाचे नाही असा पवित्रा घेऊन त्यांना अध्यक्ष केले. कवी, कीर्तनकार, शिक्षक, काव्यसमीक्षक, संत, रवींद्रांच्या व तुळशीदासांच्या काव्यांचे अनुवादक अशा अनेक नात्यांनी महाजन मराठवाड्यात आणि मराठवाड्याबाहेर इतके सुपरिचित आहेत की, माझ्यासारख्याने त्यांचा परिचय करून देण्याचे खरोखरीच काही कारण नाही. साहित्यक्षेत्रातील हा महाजनांचा पहिला प्रवेश नव्हे किंवा मी कोणी मातबर असा नव्हे की, ज्याच्या प्रोत्साहनाची रसिकांच्या समोर आपला प्रसव नेताना गरज भसावी.
वयाने, मानाने, तपाने, कार्याने व साहित्यक्षेत्रातील स्थानाने महाजन इतके मोठे आहेत की, त्यांच्या काव्याचे कवी म्हणून मूल्यमापन मी करू धजणे मर्यादातिक्रम होण्याचा संभव आहे. महाजन साहित्य प्रकाशन मंडळाचे उत्साही चिटणीस श्रीयुत वि. द. सर्जे यांचे मजवरील प्रेम जर आंधळे नसते तर कदाचित् ही प्रस्तावना मी लिहिलीही नसती. श्री. सर्जे यांना मी म्हणजे फारच विद्वान माणूस वाटतो. मला अशक्य असे काही या जगात असेल असे त्यांना वाटतच नाही आणि तत्त्वचर्चा करून त्यांच्या मतात बदल होण्याचा संभव नाही. मी खरोखरी फारसा विद्वान माणूस नाही असे श्री. सर्जे यांना पटवून देऊ लागलो तर ते म्हणतील, 'खरोखर कुरुन्दकर, इतका अजोड कोटिक्रम तुमच्याशिवाय कोणी करू शकणार नाही.' या त्यांच्या अकृत्रिम प्रेमाचे बंधन इतके घट्ट आहे की, त्यांनी लिहा म्हटल्यानंतर नाही म्हणणे मात्र शक्य नाही.
प्रस्तावनेच्या निमित्ताने हे खंडकाव्य चाळीत असताना माझी अशी खात्री झाली की, काही बाबींचे स्पष्ट दिद्गर्शन जर झाले नाही तर महाजनांच्या या खंडकाव्याचे मूल्यमापन करताना आपण त्यांच्यावर अन्याय करून बसू. इ.स. १९३२-३३ च्या सुमारास हैद्राबाद संस्थानातील सनातनधर्मावर श्रद्धा असणाऱ्या कवीने तो त्या राजवटीत सरंजामदार असतानाही लिहिलेले असे हे काव्य आहे. मला वाटते वरील सूत्रांतून या खण्डकाव्याकडे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. असे जर पाहिले नाही तर महाजनांच्यावर अन्याय होण्याचा संभव कसा आहे हे क्रमाने थोडक्यात सूचित करतो.
आज १९६० साली ही प्रस्तावना लिहीत असताना माझ्यासमोर माझ्या