आणखीही सूक्ष्म जाणीव आहे व गुंतागुंतीचीही आहे. बरसत्या धारांच्यामध्ये भिजलो नाही, किनारे भेटलेच नाहीत, हे सांगताना कवी सांगतो, आयुष्य भटक्या ढगासारखे गेले. हे शरद ऋतूतील भटके ढग स्वत:च एक सौंदर्य असतात आणि काळ्या वातावरणात नसतात- निळाईतून वावरत असतात. लाटावर झेपावलो नाही, ही खंत आहे हे खरे; पण जन्म गेला कसा- तर किनाऱ्यावर बसून लाटांचे सूर टिपीत गेला. नुसताच वाळू तुडवीत गेला नाही. बेभान व्हावे व जन्म सार्थक झाला, असे वाटावे या जातीचे काही घडले नाही, हे तर खरेच; पण अभ्राप्रमाणे भटकलो, लाटांचे सूर टिपले, हेही खरे. थोडक्यात यापरीस औदासीन्य किती पदरी व किती पातळ्यांवरील म्हणून उकलून दाखवावे? या व्यामिश्र, अनेक पदरी गुंफणीमधूनच या कवितेत सौंदर्य आहे. कवीला हे जमते तेव्हा त्याची कविता सोन्याची असते. हे जमत नाही तेव्हा जरतारी असते.
श्री श्रीपाद कावळे यांची कविता आता बाल्य संपवून ऐन वैभवात आलेली आहे. तिला स्वत:चा सूर सापडलेला आहे, स्वत:ची शब्दकळा सापडलेली आहे.
या उंचीवरून ती किती प्रवास करते व याही वरील झेप केव्हा घेते, याची प्रतीक्षा कवितेचे खरे रसिक करीत राहतील. रसिकांनी प्रतीक्षा करीत थांबावे हे भाग्य कवीसाठी लहान नसते.