म्हणूनच जर नवे देऊळ बांधता येत नसेल आणि ओंजळ रिती असेल तर जुनी देवळे पाडावीत का, हा प्रश्न उभा राहतो. चिघळत्या जखमांचे चित्कार तर जागरूकपणे ऐकलेच पाहिजेत. पण इतिहासजमा दुष्टाव्याचा मागोवा घ्यायचा नाही, भूतकाळात गुंतायचे नाही म्हटल्यावर जे शतकाचे सलणारे काटे असतात त्याचे नेमके अर्थ कसे कळणार? मध्येच कवी सांगतो, माणूस जोपासणारे हातच जर दिसत नसतील तर वाळवंटातील खजुरांचे मनोगत तेथे सांगावे काय? तृषार्त उंटाच्या दीर्घकथा तेथे सांगाव्यात काय? बर्फनगरीतल्या निष्पर्ण झाडांचे स्पंदन सांगावे काय? या प्रश्नांचे आपण तरी उत्तर काय देणार? कारण ज्यांना गरज नाही त्यांना सांगून उपयोग नसतो आणि ज्यांना माणूस जोपासणारे हात असण्याची गरज वाटत नाही त्यांनाच वाचविण्यासाठी सारे सांगणे ही आपली गरज असते. म्हणून कुणी ऐको वा न ऐको, प्रत्येक दारावर थाप मारीत-ठोठावीत हिंडणे भाग असते.
हे मन पराधीन आहे. त्याला उत्तरे जवळ असूनही सापडत नाहीत. आपलेच प्रश्न आपल्याला प्रश्नचिन्ह बनून वाकुल्या दाखवीत असतात. अशा वेळी नेमके काय होते? काय व्हावे? कवीने याचे उत्तर दुहेरी दिले आहे. जेव्हा सोबत कुणीच नसते तेव्हा सावल्या अंधाराच्या स्वाधीन होतात, हे पहिले उत्तर आहे. तर अशावेळी एकटी दिवलाण दिवस उगवण्याची वाट पहात एकटीच तेवत असते, हे दुसरे. या दोन्ही उत्तरांत आपआपल्या कक्षेत सत्यता आहे, अर्थ आहे. पण एकच एक उत्तर मात्र निरर्थक आहे.
अजून मला आवडलेल्या एका कवितेविषयी चार शब्द लिहिले पाहिजेत. मी जी संमिश्र, अनेक पातळीवरची व अनेक पदरी जाणीव म्हणतो ती या कवितेत अतिशय तलम होऊन उतरलेली आहे. 'आयुष्य असेच गेले' हे या कवितेचे शीर्षक आहे. एवढे शीर्षकच आपण वाचले तर त्याचा अर्थ सरळ व स्पष्ट आहे. करायचे होते ते करता आले नाही. टाळायचे होते ते टाळता आले नाही. सर्व आयुष्य हे असेच निरर्थक गेले आणि शेवटी सगळ्या आयुष्याचा अर्थ काय उरला तर रिती ओंजळ. कवीला नेमके हेच म्हणायचे आहे, अशी मात्र माझी खात्री नाही. काळोखे आकाश पाहण्यातच आयुष्य गेले असे तो म्हणत नाही. तो सांगतो, नृत्य सरल्यानंतरचे चंद्रहीन आकाश मी बघत आलो. प्रकाशहीन अंधारलेले जग ही निराळी जाणीव आहे आणि नृत्यहीन, चंद्रहीन जग ही निराळी जाणीव आहे. पहिल्या ठिकाणी निराशा आहे. दुसऱ्या ठिकाणी फक्त उल्हासाचा अभाव आहे आणि या दोन जाणिवांच्या मध्ये एक