Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७. कबरीतील समाधिस्थ


- सुधाकर गायधनी

 प्रिय सुधाकर गायधनी

  स.न.

 कबूल केल्याप्रमाणे मनाने थोडासा स्थिर होताच मागच्या तातडीच्या प्रश्नांचा निरोप घेतला व स्वस्थ चित्ताने तुमचा कवितासंग्रह वाचला. मी यापूर्वीच हे लिहिले होते की, अशा रीतीनेच शांतपणे मी कविता वाचतो. मनाच्या उद्विग्न अवस्थेत मला कविता वाचणे जमत नाही. आता नव्याने हे लक्षात आले आहे की तुमचा पत्ता मजजवळ नाही; तेव्हा हे पत्र आपणास केव्हा व कसे मिळेल देव जाणे.

 आपल्या कवितेविषयी द. भि. कुलकर्णी यांनी जे लिहिले आहे त्यातील आशयाशी मी सहमत आहे. ते कलावादी आणि मी जीवनवादी. म्हणून त्यांच्या भाषेशी सहमत होता येणे मला कठीण आहे. वाचकाला स्थलकालाच्या वलयातून मुक्त करून स्थलकालात्मक रसमय अनुभवाचा प्रत्यय देणारी ही कविता आहे असे द. भि. कुलकर्णी म्हणतील. मी तसे म्हणणार नाही. सामाजिक जाणिवा व्यक्त करणारी कविता स्थलमुक्त असते, म्हणजे ठराविक ठिकाणी, ठराविक वेळेला, अमुक व्यक्तीला हा अनुभव आला अशा स्थलप्रदेश विशिष्ट जाणिवेतून ही कविता मुक्त असते. पण तिला कालमुक्त म्हणता येणार नाही. सामाजिक जाणिवा तीन मार्गांनी काळाला बांधलेल्या असतात. कवीच्या ठिकाणी ही जाणीव असते. काळ निराळा असला तर जाणीव निराळी होते. सामाजिक अवस्थेला ही जाणीव बांधलेली असते. समाजाची अवस्था बदलली की ती जाणीव बदलते. वाचणाऱ्या रसिकांच्या जाणिवांना ही कविता बांधलेली असते. रसिकांना हे अनुभव नुसते समजून चालत नाहीत. त्यांना ते जाणवावे लागतात. म्हणून तुमची कविता स्थलमुक्त झाली तरी कालमुक्त होणार नाही. सामाजिक जाणिवा असणारी कविता-कधी कालमुक्त होत नसते. हा झाला

१२४ / थेंब अत्तराचे