Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 निसर्गसौंदर्य संवेदनशील मनाने टिपण्याचे कवीचे कार्य एका बाजूने सतत चालू असते. हे चालूच राहायला हवे, कारण कवितेचा प्राणच त्यामुळे अस्तित्वात येतो. पण हे संवेदनशील मन सामाजिक संदर्भात मुरलेले असते, हेही अपरिहार्यच आहे. हे सारे सांगताना याक्षणी माझ्या मनात पुरोगामीप्रतिगामी अशा प्रकारची शिरोभूषणे नाहीत. फक्त स्वाभाविक व अपरिहार्य अशी अनुभवाची बांधणी आहे.

 श्री. कावळे यांच्या कवितेत ज्या ठिकाणी समाज जाणवण्याइतपत व्यक्त आहे, ती ठिकाणे आपण क्षणभर बाजूला ठेवू आणि जिथे केवळ समोरच्या सौंदर्यावर कवी मुग्ध व लुब्ध झालेला आहे ती ठिकाणे पाहू. मला तिथेही समाज जाणवतो.

 समोर तळे पसरले आहे. सायंकाळ होत आहे. तळ्याच्या सावळ्या कायेवर मधून मधून हिरवे गोंदण दिसत आहे. कमळाची तरंगती पाने आणि लाटा असे हे शांत वातावरण आहे. पण त्याचे चित्रण करताना मध्येच हे तळे निष्पाप आणि निरागस आहे, याची नोंद होऊन जाते. तळ्याचे हे निष्पाप आणि निरागस असणे याचा संबंध समाजाशी असतो. सायंकाळ होतच आहे. रात्रीला फार थोडा अवकाश उरलेला आहे. आता थोड्या वेळात या तळ्याच्या काठावर थकलेल्या पक्ष्यांचे थवे विश्रांतीसाठी उतरतील. आकाशातील अप्सरा सरोवरावर उतरतील. तृषार्त चकोर चांदणे टिपून निघून जातील. थोडक्यात अशी रात्र येईल, बहरेल आणि ओसरून जाईल. त्यानंतर दवारलेली रेशमी शाल पांघरण्यासाठी पहाट येईल.

 रात्रीला रात्रीचे सौंदर्य आहे. पहाटेचे सौंदर्य आहे. या सौंदर्याचे मोल मी मानतो. एखाद्या कर्मठ बोधवाद्याप्रमाणे रात्र संपून जाईल आणि पहाट येईल हा कवीचा आशावाद आहे, असे मी म्हणणार नाही. कारण येथे रात्र ही चांदणी रात्र आहे. तिच्या कुशीत थकलेल्या पाखरांना झोप आहे आणि या रात्री अप्सरांचा विलास आहे. ही रात्र संपणे व पहाट येणे, म्हणजे निराशा संपून आशेचा उदय होणे नव्हे, इतके मलाही कळते. रात्रीची पहाट होताना या कवितेत आपण एका सौंदर्याकडून दुसऱ्या सौंदर्याकडे जातो असे मला म्हणायचे आहे. एका सौंदर्यात शांत गहिरेपणा आहे, तर दुसऱ्या सौंदर्यात ओलसर उल्हास आहे. लगेच दुसऱ्या बाजूने वळून ही कविता प्रतिगामी स्थितिवादी आहे असा शिक्का मी मारणार नाही.

 या कवितेत वारंवार, तळ ढवळू नकोस अशी सूचना आहे. तळापासून

अवस्था / ११९