पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निसर्गाचे चित्रण कवितेत करतानासुद्धा आपण मानवी मनाचेच चित्रण करीत असतो. पाहता पाहता कवितेतील निसर्ग माणसाच्या प्रमाणे दिसू लागतो.

 निसर्गचित्रणासाठी जाणारे कवीसुद्धा निसर्ग पाहताना ते निमित्त करून पुन: माणूसच पाहतात, कारण पाहणारा कवी माणूसच असतो. निसर्ग आणि माणूस यांची गुंतागुंत हाच निसर्गचित्रणातील एक प्रमुख विषय असतो. कवीची इच्छा नसतेच; पण जरी त्यांची तशी इच्छा असली तरीही कवींना स्वत:च्या माणूसपणापासून दूर जाणे जमणारे नाही.

 पूर्वेची पेठ लुटून, सुवर्णमुद्रांचा वर्षाव करीत प्रविष्ट होत असलेला सूर्य ही केवळ निसर्गातली प्रतिमा असू शकत नाही. सूर्य पूर्वेला उगवतो हे सर्वमान्य आहे. सूर्य उगवताना सगळीकडे प्रकाश पसरतो हेही सर्वमान्य आहे; पण कवितेतील सूर्य नुसता पूर्वेला उगवत नाही- तो पूर्वेची बाजारपेठ लुटून नंतर प्रविष्ट होतो आणि ही लूट करताना समृद्ध झाल्यामुळे सुवर्णाचा वर्षावही करतो.

 येथे पूर्वेची पेठ लुटण्याचा उल्लेख आल्याबरोबर सूर्य हा केवळ निसर्गातील सूर्य राहात नाही. त्या सूर्याला माणसाच्या इतिहासाचे संदर्भ जाऊन चिटकतात. कवितेतील पूर्व ही केवळ पूर्व दिशा न राहता त्यापेक्षा काही वेगळी होऊन जाते. हे घडणे अपरिहार्य आहे; कारण ती कविता आहे. माणूस आणि निसर्ग यांच्या अनुबंधावर कविता लिहिणारे कवी सुद्धा माणूस, समाज व निसर्ग यांच्या परस्पर अनुबंधावरच लिहीत असतात.

 कवी हा शेवटी निराळ्या प्रकारचा, पण माणूस असतो. आणि हे कवीचे माणूस होणे व असणे सुटे आणि एकाकी नसते. निसर्गाच्या सहवासाबरोबरच समाजाच्या सहवासातूनही ते निर्माण होते. कवींना कधी निसर्ग विसरता येत नाही; त्यांना समाजही विसरता येत नाही आणि आपण कवी आहोत हेही विसरता येत नाही.

 कावळे यांची कवितासुद्धा हे सारे पदर एकत्र करीतच शब्दबद्ध होते. ती निसर्गाविषयीची कविता आहे हे जितके खरे, तितकेच ती समाजाविषयीची कविता आहे हेही खरे आहे. जे जन्मभर तळपता सूर्य माथ्यावरच घेऊन चालले, पायाखाली तप्त वाळवंट आणि माथ्यावर तळपता सूर्य असेच जे चालत गेले आणि ज्यांना खजुरीचे झाड भेटलेच नाही, त्यांचेही एक शोभापात्रच होऊन गेले याची खंत ज्या कवीला वाटते, त्याचे मन केवळ माणूस व निसर्ग इतकाच विचार करीत आहे, असे आम्हा वाचकांना काय म्हणून वाटावे?

११८ / थेंब अत्तराचे