पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सारे ढवळून काढल्याशिवाय क्रांती कशी होणार? तळ ढवळू नका म्हणजे काय? हा स्थितिवाद आहे असे मी म्हणणार नाही; कारण या कवितेतील तळे समाज नव्हे. ते कवीचे स्वत:चे मन आहे आणि तळ ढवळल्यानंतर नेहमी क्रांतीच होते असेही नाही. फक्त वासनांचा गाळही उसळतो. म्हणून मी कवितेचा आस्वाद घेताना पुरोगामी-प्रतिगामी हे शब्द बाजूला ठेवायला तयार आहे; पण तरीही समाज जाणवतो. सामाजिक जाणीव म्हणजे फक्त सामाजिक क्रांतीची व परिवर्तनाची जाणीव, एवढेच नसते. मुळात हे सौंदर्य कोणतेही विघ्न न येता निर्वेधपणे मला आस्वादिता आले पाहिजे- हा माझा अधिकार आहे ही जाणीवच सामाजिक आहे.

 समाज या घटकाला मी इतके महत्त्व देतो आहे, याला कारण आहे. कविमनाचे व्यक्तिवैशिष्ट्य- त्या मनाची संवेदनक्षमता मी गौण समजत नाही. तो तर कवितेचा प्राण आहे. पण या प्राणाचा विचार करता करता आपण एका चुकीच्या वर्गवारीकडे नकळत जात असतो. त्या वर्गवारीला अभ्यासाची सोय म्हणून मीही शरण जाईन; पण तत्त्वत: ही वर्गवारी मिथ्या आहे, असे मला म्हणायचे आहे. उगीचच आपण असे म्हणतो की, अमुक या कवीच्या सामाजिक जाणिवा फार तीव्र आहेत. एखाद्या कवीविषयी आपण म्हणतो की, हा सामाजिक जाणिवेचा कवी नसून आत्मनिष्ठ कवी आहे. अजून एखाद्या कवीविषयी आपण म्हणतो, हा समाजाविषयी उदास आहे. या सगळ्या अभिधानांना फार मर्यादित अर्थ आहेत. कवी सामाजिक मनाचा असतोच. परिवर्तनाच्या दिशांचा आग्रह कुठे बलवान असतो; कुठे नसतो, पण सामाजिकता म्हणजे परिवर्तनाचा आग्रह इतकेच नसते. मला समाजाशी कर्तव्य काय असे म्हणणाऱ्या कवीची जाणीवही सामाजिक असते.

 कावळे यांची कविता सतत माणूस आणि निसर्ग यांच्या परस्पर बंधात गुंतलेली आहे. म्हणजे काय आहे, तर व्यक्तिमनाच्या सर्व वैयक्तिक, सामाजिक जाणिवा निसर्गात पेरून त्या निसर्गाचे चित्र काढणारी ही कविता आहे. सामाजिक जाणिवांच्यासह ही कविता निसर्गात जात असल्यामुळे मानवी संस्कार नसलेला सहज निसर्ग आणि माणसांनी संस्कारित केलेला निसर्ग या दोहोत कोणताही भेद करण्याचे कारण कवीला वाटत नाही. घनदाट अरण्यातून चालत आलेली पाउले शीतगंभीर जलाशयाच्या काठावर स्थिरावतात. या जलाशयाच्या काठावर एक फाटका ध्वजही फडफडत आहे. माणसांनी न बनविलेले अरण्य आणि माणसाने निसर्गाला गरजेचा आकार देऊन बनविलेला ध्वज या दोन्हीकडे कवी

१२० / थेंब अत्तराचे