पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिला स्त्रीसुलभ लज्जाही उरत नाही. जिथे उद्दीपन आणि आलंबन दोन्ही सारखेच होतात, तिथे स्थायीभाव कोणत्या अधिष्ठानावर बूड टेकून सचेतसां होणार? पण डॉक्टरांना हे कुणी सांगावयाचे? रेगे-पोवळे सूत्रांत बी. रघुनाथ न बसणे म्हणजे काहीतरी पाप ही चोरटी जाणीव त्यांच्या मनात असल्यास न कळे.

  बी. रघुनाथांनी टिपलेले दृश्य संपूर्णत: दृकनिष्ठ असते, या अर्थी ते फक्त डोळ्यांनाच प्रामाणिक राहतात. पण अशा अनुभवांत 'ब' पद प्राधान्यामुळे फक्त डोळ्यांनाच मज्जाव होतो आणि संवेदनांच्या वैभवाची शक्यता बरीच कमी होते. काव्यांत अभिव्यक्त करावयाचा अनुभव व्यक्तीकरणाच्या तोलामोलाचा आहे किंवा नाही, हे ठरविण्यात ते फार दक्ष आहेत. पण काव्याची गरज इतक्याने पूर्ण होत नाही, हा व्यक्त होणारा अनुभव अंत:चक्षूंसमोर एकजीव होऊन साकारणे हेही महत्त्वाचे आहे या बाबीकडे दुर्लक्ष झाल्यामळे त्यांच्या काही अत्यंत सुंदर कवितांतून देखील अप्रस्तुत पदर आढळतात. 'नगरभवानी' ही काव्यकृती वस्तुत: तिच्याकडे पाठ फिरवून साकार होते. अशा काव्यकृतीत नगरभवानीचे रूपसौंदर्य व तिच्या पदराआडच्या व्यथा, याचे वर्णन अप्रस्तुत आहे.

 गुणदोषांची ही चर्चा लांबवीत नेणे कठीण नाही पण कित्येकदा अशा चर्चा निरर्थक होतात. काव्यात असणारे प्रतिमा-कल्पनांचे वैभव आणि जिवंतपणा हीच शेवटी विजयी ठरतात. मराठवाड्यात चांगले कवी आधीच थोडे. बी. रघुनाथ हे त्या थोड्यांपैकी एक श्रेष्ठ. त्यामुळे त्यांच्या काव्याचा जितका अभ्यास होईल तितका थोडा असे वाटणे स्वाभाविक आहे. 'आलाप आणि विलाप' च्या प्रस्तावनेत यशवंतांनी बी. रघनाथ यांच्या कविता 'रसत्वाप्रत जात नाहीत' असा शेरा मारला आहे. या संग्रहातील जवळ जवळ अठ्ठावीस प्रत्ययपूर्ण कवितांतून एक अत्यंत उत्कट अशी प्रेमकहाणी चित्रित झाली आहे. या कहाणीचे विविध पदर सलग गुंफून यशवंतांच्या शेऱ्याला विधायकरीत्या खोडून काढणे सहज शक्य आहे. पण हे काम 'उद्या' वर सोपवून आज म. सा. प च्या कार्यकर्त्यांचे, एक चांगला कवितासंग्रह प्रसिद्ध केल्याबद्दल अभिनंदन करूनच थांबतो.

१० । थेंब अत्तराचे