पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उदाहरणे. अभिव्यक्तीची ही धडपड आणि साफल्य मान्य करून सुद्धा काही बोचणारी जाणीव उरतेच. शब्दांना खरोखरच माध्यम समजण्यामुळे आशय आणि अभिव्यक्ती यांत एक अंतर निर्माण झाले आहे. वस्तुत: शब्दांकित नसलेली अशी कोणतीही अनुभूती कलात्मक पातळीवर जाऊन काव्यानुभूती होत नाही. यामुळे एकीकडे त्यांची अगदी वाईट कविता शैलीसाठी महत्त्वाची होते तर त्यांची अगदी उत्कृष्ट कवितासुद्धा एकजीव असत नाही.

 त्यांच्या बहुतेक चांगल्या कविता एक तर स्मृतींची तार छेडीत जन्म घेतात आणि साध्या-सुध्या शब्दांनी उत्कट भावना व्यक्त करतात, अगर दृश्य टिपीत असताना निर्माण होतात आणि कल्पनाविलास लेवून प्रकट होतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ, इथपासून उघड्यावर न्हाणारी नग्ना, नागर झालेला रस्ता इथपर्यंत विविध दृश्ये टिपली आहेत. ही दृश्ये टिपताना एका अर्थी ते फक्त डोळ्यांना प्रामाणिक राहिले आहेत. पण दुसऱ्या अर्थी फक्त डोळ्यांनाच अप्रामाणिक झाले आहेत. श्री. मर्ढेकर यांच्या मते कवीच्या अनुभूतीचे व्यवच्छेदक लक्षण असे की, तिच्यात दोन पदे आणि एक समानता आढळते. मला हा मुद्दा फारसा महत्त्वाचा जरी वाटत नाही तरी बी. रघुनाथ यांच्या स्मृतीतून जन्म घेणाऱ्या कवितांच्या संदर्भात आठवला. कारण त्यांच्याही अनुभूतीत अशी दोन पदे आढळतात. या दोन पदांतील प्रथम पद प्राथमिक अनुभवाचे असते, तर द्वितीय पद सहचारी कल्पनांनी सुचविलेल्या कोणत्या तरी स्त्रीचे असते आणि जेव्हा अभिव्यक्ती होते तेव्हा हे दुसरे पद प्राधान्य पावते. त्यांना नुसत्या उषेचे दर्शन न होता स्मरकोविदेचे दर्शन होते व तेच प्राधान्य पावते. मानिनी, अभिसारिका, खंडिता, वासकसज्जा, अशी कशीही का होईना पण एक स्त्री, हे पद असतेच. या पदामुळे डॉ. ना. ग. जोशी यांच्या सारख्या महात्म्यांना सुद्धा ही कविता भोगातुर, भोगलालस इत्यादी इत्यादी असल्याचा भास होतो. पण हा केवळ भासच आहे. कवीची प्रकृती भोगातुर ठरण्यासाठी, अगर शृंगाररस निर्माण होण्यासाठी स्थायीभावांना सचेतसां व्हावे लागते आणि केवळ डोळे यासाठी अपुरे आहेत. बी. रघुनाथ दृश्य टिपताना तो क्षण मागच्या पुढच्या संदर्भातून वेगळा काढतात. आणि बेभान होऊन डोळ्यांनी पिऊन टाकतात. उघड्यावर जल वेषात न्हाणारी स्त्री त्यांच्यासाठी केवळ एक दृश्य होते. पार्थिव सौंदर्यांचे रसग्रहण करताना त्यांना जशी अनीतीची जाणीव नाही, तशीच चोरटी धन्यताही नाही. अर्थातच यांच्यापोटी जन्म घेणारी अभिलाषाही नाही. त्यामुळे न्हाणारी बाई, 'बाई' ठरत नाही.

पुन्हा नभाच्या लाल कडा / ९