पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२. मोत्याची मागणी

- दे. ल. महाजन

 कविवर्य दे. ल. महाजन यांचा व माझा परिचय बराच जुना आहे. हैद्राबाद संमेलनाच्यासाठी निधी गोळा करण्याच्या मोहिमेवर जेव्हा मी होतो तेव्हा त्यांचा माझा प्रथम परिचय झाला. साहित्यपरिषदेच्या सर्वांत खालच्या स्वयंसेवकांच्या वर्गापैकी मी एक होतो आणि महाजन मराठवाड्याच्या साहित्यिक श्रेष्ठीत दाखल होऊन जमाना उलटून गेलेला होता. नवनव्या साहित्यिकांचा परिचय करून घेणे, त्यांच्या अभ्यासास वळण लावणे, त्यांच्या वाङ्मयीन गुणांचे संगोपन करून त्यांस पुढे आणणे ही महाजनांची जुनीच खोड आहे. मराठवाड्यातील साहित्यिकांच्या दोन पिढ्या त्यांच्या संस्काराखाली निर्माण झाल्या. माझ्याकडेही, साहित्यक्षेत्रांतील नवे रिक्रूट म्हणून ते पाहत होते. असा नवोदित माणूस वृद्ध महाजनांचा कायाकल्प करून त्यांना पुन: तरुण करतो. पुढे प्रतिभानिकेतनच्या सावलीत आम्ही दोघे सहकारी म्हणून एकत्र आलो. साहित्यिकांना त्यांच्या लहरी सांभाळून जगविणारी ही शाळा या विशिष्ट रूपात तिचे संगोपन करण्यात महाजनांचा फार मोठा वाटा आहे. सौजन्य आणि अजातशत्रुत्व यांची महाजनांना जणू उपजत देणगी असल्यामुळे आपल्या शिष्य-प्रशिष्यांना पुढे करून त्यांच्या वाढत जाणाऱ्या प्रतिष्ठेचे कौतुक करण्यात महाजन इतके रंगले की, आपण मागे राहत आहो याचीही त्यांना धन्यता वाटली. निवडणुकीचे सव्यापसव्य त्यांच्या प्रकृतीला फारसे मानवणारे नाही मराठवाड्यातील मराठी विषयक ज्या हालचाली गेल्या ३० वर्षांत झाल्या त्यात महाजनांचे स्थान इतके मोठे आहे की, मराठवाडा साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना इतका उशिरा का मिळावा हेच मोठे कोडे पडले साहित्य परिषदेतील अंतर्गत प्रवाह माहीत असणाऱ्यांना हे कोडे पडण्याची वस्तुत: गरज नाही. परभणी संमेलनापर्यंत अध्यक्ष बाहेरचा असावा असा जणू संकेत होता आणि परभणी संमेलनापासून दर वेळी महाजनांचे नाव अध्यक्षपदासाठी

मोत्याची मागणी / ११