या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कवीच्या जवळ एक प्रौढ जाणीव अशी आहे की, तो वाट सापडलीच आहे असे समजत नाही, वाट शोधतो आहे, असे समजतो. वाटा शोधताना स्वत्व गमवायचे नाही. आपल्या सावलीला अंतर द्यायचे नाही, अशी त्याची समजूत आहे. उगीचच मोडतोड करणे आणि आभाळ फाडणे या आततायी मार्गाने तो जात नाही. कारण फाडणारे व शिवणारे आपणच आहोत, हे त्याला माहीत आहे. आपण समूहापेक्षा वेगळे नाही. सर्वांच्यासह आपण, हे तो मानतोच, पण त्याशिवाय व्यक्ती म्हणून आपले निराळे अस्तित्वही तो मानतो. झाडांनी रानाला जोगवा मागणे, त्याला मान्य नाही. झाडांनी फांदीवरच्या पक्ष्यांना गाणे देत झाड म्हणूनच जगले पाहिजे असे त्याचे मत आहे. मी या तरुण कवीचे त्याच्या सर्व समंजसपणासह स्वागत करतो.
११६ / थेंब अत्तराचे