- श्रीपाद कावळे
श्रीपाद कावळे यांचा हा दुसरा कवितासंग्रह आहे. बट्रॉन्ड रसेलने मानवी संबंधाची विभागणी करताना ती तीन गटांत केलेली आहे. माणूस आणि माणूस यांच्यातील संबंध, माणूस आणि समाज यांच्यातील संबंध आणि माणूस व निसर्ग यांच्यातील संबंध असे रसेलने कल्पिलेले तीन गट आहेत. ही विभागणी करताना कवी आणि कविता हा विषय रसेलसमोर नाही. कदाचित रसेलने माणूस आणि निसर्ग हा कवितेचा खरा विषय आहे हे मान्य केले नसते, पण कवीच्या मनात हीही कल्पना रुजू शकते. कावळे यांचे म्हणणे असे आहे की, कवी आणि निसर्ग हा आपल्या कवितेचा प्रमुख विषय आहे. माणूस निसर्गाच्या सहवासात जगत असतो. हे जीवन जगताना निसर्गाने ज्या प्रतिक्रिया आपल्या मनात निर्माण केल्या, तो या कवितांचा विषय आहे, असे कवीला जाणवते आहे. कवीला स्वत:च्या कवितेविषयी काय वाटते याची ही नोंद आहे. वाचकांना ही कविता वाचताना काय जाणवेल याची नोंद वाचकांनी करावयाची आहे.
निसर्ग हा विषयच थोडा गुंतागुंतीचा आहे. निसर्गाने आपला काही तरी ठसा ज्या मनावर उमटविलेला नाही असे कविमन सापडणे फार दुर्मिळ आहे. कवी कोणत्याही भाषेतला, कोणत्याही युगातला वा संस्कृतीला असो, त्याचा आणि निसर्गाचा संबंध आलेला असतोच. अगदी नवे कवी जरी घेतले तरी कविमन निसर्गाला पारखे असू शकत नाही, हे एक सत्य आहे. जाणीवपूर्वक अगर अजाणता निसर्ग हा कविमनाला वेढून बसलेला असतोच, हे एक न नाकारता येणारे असे पहिले सत्य आहे. आणि कविमन या निसर्गाशी एकरूप होत असताना आपले मानवी जीवन सतत निसर्गावर आरोपित करीत असतो. आपले माणुसपण निसर्गात पेरीत, प्रक्षेपित करीतच आपण निसर्ग पाहतो, हे लौकर मान्य न होणारे पण तरीही नाकारता न येणारे दुसरे सत्य आहे.