अरुण शेवते यांच्या वाङ्मयोपासनेचा हा आरंभ आहे. या अगदी तरुण वयात पाहायचे असते ते हे की, या कवीत सुप्तशक्ती किती आहे. या दृष्टीने शेवते यांची कविता अतिशय आशादायक आहे. वाङ्मयाच्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकण्यासाठी जी सुप्तशक्ती लागते, तिचा प्रत्यय तर या संग्रहात येतोच, पण शब्दांविषयी एक प्रौढ जाणीव कवीजवळ असावी लागते, तिचा प्रत्ययही येतो. वाङ्मयाच्या जगात भाकितांना तसे फारसे महत्त्व नसते; पण समोरच्या पुराव्यावरून अनुमान करायचे तर शेवते यांनी फार मोठ्या आशाअपेक्षा निर्माण केल्या आहेत असे म्हणावे लागेल.
काही कविता कावळ्यांच्या मध्ये काय- अगर 'कावळ्यांच्या नावाने' कवितांच्यामध्ये काय, सतत हा कवी वाटांच्या विषयी बोलतो आहे असे दिसून येईल! व्यक्तिश: प्रत्येकालाच जीवनामध्ये आपली वाट कोणती हा निर्णय घ्यावा लागत असतो. हा निर्णय घेताना 'माझी वाट कोणती?' या प्रश्नाचे एकदा नि:संदिग्ध उत्तर दिले पाहिजे. एखादी वाट केवळ दुसऱ्याची आहे यामुळे वर्ण्य ठरत नसते. नाही तर एकाच्या चिंतनाचा दुसऱ्याला फायदा होणार नाही. आणि वेगळेपणाच्या हट्टापायी प्रत्येकजण वेगळा उभा राहिल्यामुळे समूहजीवन अशक्य होईल. “माझी वाट' म्हणजे मी स्वत: निर्णय घेऊन ठरवलेली वाट. इथे वाट वेगळी असणे म्हणजे तुलनेने गौण. निर्णय माझा असणे महत्त्वाचे, म्हणूनच आपल्या सावलीला अंतर द्यायचे नसते असे कवी म्हणतो.
माकडापासून उत्क्रांती क्रमात माणूस जन्माला आला असे आपण म्हणतो. माकडांची गणना पशूच्यामध्ये व्हावी आणि माणूस मात्र त्याहून निराळा मानावा, याचे कारण आपण काय सांगणार आहोत? शरीराच्या दृष्टीने अंगावरील केस कमी झाले, डोक्यावरील वाढले, शेपूट गळून पडली, यांची नोंद करता येईल; पण माणूस आपले पशुत्व किती प्रमाणात गमावू शकला, पुसून टाकू शकला, की शेवटी सर्व इतिहासाचे संदर्भ शेपूट असणे व नसणे इतकेच आहेत का?
शेवते यांची कविता अजून प्रतीके व सूचितार्थ यांच्यासह येणारे जीवनभाष्य या कक्षेत आहे. प्रतिमांच्यामध्ये असणाऱ्या सौंदर्याकडे व सामर्थ्याकडे अजून या कवितेचे लक्ष प्रमुख केंद्र म्हणून वळलेले नाही. त्यामुळे ही कविता एक प्रतीक गृहीत धरताच साधी, सोपी व सरळ होते आहे. या पातळीच्या बाहेर ही कविता जाण्याचा प्रयत्न करील व तिचे नवनवे सामर्थ्य प्रकट होईल ही माझी खात्री आहे.