पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कावळ्यांच्या नावाने' आणि 'कविता कावळ्यांच्या' असे दोन भाग पडलेले आहेत. आपली जीवनातील पूजास्थाने आणि वाङ्‍‍मयातील जिज्ञासास्थाने यांच्यात असणारा फरक ज्यांना आरंभापासून नीटपणे कळतो, त्यांच्या उद्याच्या वाङ्‍‍मयीन विकासाबाबत आपण निश्चिंत राहायला हरकत नाही असे मला वाटते.

 शेवते यांनी आपल्या कवितेचा फार मोठा भाग कावळ्यांना दिला आहे. कावळ्यांचा इतका तपशिलाने आपल्या कवितेत विचार करणारा हा पहिलाच कवी आहे. या कवितांच्या मधील कावळा हा केवळ प्रतीक नाही. निमित्त कावळ्याचे करून माणसांच्या विशिष्ट वर्गाविषयी बोलण्याचा हा प्रयत्न नाही. कितीही प्रयत्न केला तरी प्रतीकांना एकपदरीपणा टाळता येत नसतो. जसा हा कावळा केवळ प्रतीक नाही. त्याप्रमाणे तो केवळ पक्षी नाही. केवळ पक्षी म्हणून कावळ्याचे जे काही स्वरूप असेल ते असो. पण कावळ्यांना संस्कृतीत अनेक सांकेतिक संदर्भ प्राप्त झालेले आहेत. हा कावळा संस्कृतीचे सारे संदर्भ चिकटलेला, संस्कृतीशी अपरिहार्यपणे संलग्न असणारा पक्षी आहे. पक्षी, सांस्कृतिक संकेत, प्रतीक आणि साऱ्यांसह असणारे जीवनभाष्य यांना एकरूप करून हा कावळा अस्तित्वात आलेला आहे. कावळ्यांच्या विषयी आम्ही माणसे काय म्हणू इच्छितो हा भाग पार्श्वभूमीत ढकलून, जर हे कावळे मानवी संस्कृती मान्य करून माणसांच्या भाषेत बोलू लागले तर काय म्हणतील, ते या कवितेने सांगितलेले आहे.

 आपल्या संस्कृतीत कावळ्याबाबत अनेक संकेत आहेत. कथा आहेत. एक कावळा राक्षसाच्या वृत्तीने व्यापला जाऊन सीतेला त्रास देतो. या कावळ्याला रामचंद्राने शासन करून त्याचा एक डोळा फोडला आहे. आपले आजचे कावळे त्या रामायण- प्रसिद्ध कावळ्याचे वंशज दिसतात. रामचंद्राने कावळ्याचा एक डोळा फोडलेला असल्यामुळे अशी समजूत आहे की, कावळ्याला एकच डोळा असतो. त्यावरून तत्त्वज्ञानात काकाक्षवत् असा प्रयोग लोकप्रिय झाला आहे. कावळ्याचा एकच डोळा आलटून पालटून दोन्ही खोबणींच्यामधून वावरतो व दोन्हीकडचे पाहातो, त्याप्रमाणे मन सर्व इंद्रियांशी आलटून पालटून संयोग करून जगाचा अनुभव घेते. एक कावळा फार मोठा ऋषी आणि तत्त्वज्ञ आहे. त्याचे नाव काकभ्रशुंडी. या कावळ्याने सांगितलेले एक पुराणच आहे. कावळा उपदेश करतो आहे आणि माणसे बिचारी गंभीरपणे ते ऐकत आहेत, हे चित्र प्राचीनांनाही रोचक वाटलेले दिसते. विष्णुशर्माच्या, इसापच्या अनेक कथांमधून कावळा आपल्याला दिसतो. तो कायम लबाड आणि सतत इतरांना फसविण्यात आनंद मानणारा कोल्हा नाही, पण पुरेसा व्यवहारचतुर, भांड्याच्या

११२ / थेंब अत्तराचे