Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५. कावळ्यांच्या कविता


- अरुण शेवते

 माझे तरुण मित्र अरुण शेवते यांचा व माझा परिचय अगदी ताजा आहे. एका कार्यक्रमानिमित्त परवा नगरला गेलो होता तेव्हा, अगदी अनपेक्षितपणे या कवीचा व माझा परिचय झाला. तरुण वयात स्वाभाविक असणारा मनाचा स्वप्नाळू भावप्रधान आकार त्यांच्या स्वभावाला आहे. मी जीवनात भावुक मनोवृत्तीचेही महत्त्व मानतो. पण भावनाप्रधानतेमुळे गुंतागुंतीचे जीवन कवी साधे, सरळ, सोपे मानू लागतात आणि वास्तवतेच्या कठोर सत्य स्पर्शाला मुकतात, याची मला नेहमी खंत वाटत आलेली आहे. अरुण शेवते यांची कविता वाचत असताना मला पुन्हा एक आनंदाचा धक्का बसला. हा कवी जितका भाबडा आणि भावुक आहे, तितकाच वास्तवाला सामोरे जाताना सत्याचा जाणीवपूर्वक शोध घेणारा जिज्ञासू भक्त आहे, असे दिसून आले. जो मानवी जीवनाचा जिज्ञासू भक्त आहे, त्याच्या स्वप्नाळूपणाबाबत माझी भूमिका संपूर्णपणे स्वागताची आहे.

 भाऊसाहेब खांडेकर यांचे वाङ्‍‍मय हा विवाद्य विषय आहे. हे वाङ्‍‍मय मराठी वाचकाचे कितीही आवडते असो त्याचे वाङ्‍‍मय म्हणून मूल्य काय? हा नेहमी चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला. पण व्यक्ती म्हणून खांडेकरांच्या विषयी सर्वांनाच आदर वाटत राहिला. भाऊसाहेब खांडेकर हे शेवते यांचे परम श्रद्धास्थान आहे. खांडेकरांना गुरुस्थानी मानणारे रणजित देसाई हे प्रेम व श्रद्धेचे दुसरे ठिकाण आहे. पण शेवते यांची कविता जर पाहिली तर, ती मात्र या श्रद्धास्थानांच्या विषयी असणाऱ्या भक्तिभावाने झाकाळून गेलेली अशी नाही. कवितेचा प्रवास अगदी निराळ्या मार्गाने चालू आहे. स्वत:चा मार्ग स्वतः शोधण्याची धडपड करणारी ही कविता निरनिराळ्या बाजूंनी एकाच प्रश्नाचा विचार करताना आढळते. सरळ सरळ या कवितेचे 'काही कविता

कावळ्यांच्या कविता / १११