पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तळाशी असणारे पाणी खडे टाकून वर आणणारा असा आहे. क्वचित कावळ्याच्या मोठेपणाच्याही कथा आहेत. हंसाशी स्पर्धा करणाऱ्या व फजित पावणाऱ्या एका कावळ्याची कथा महाभारतात आलेली आहे. त्यांच्यामधून आलेल्या कावळ्यांच्या गुणांना विविधता आहे.

 भारतीय संस्कृतीत कावळ्याशी जोडलेले अनेक संकेत आहेत. पहिला म्हणजे, कावळा अमर आहे. स्वाभाविक मरणाने तो मरत नाही. मारला म्हणजे मात्र मरतो. मारला म्हणजे मरणारा- असा अमर कावळा आहे. कावळा ओरडून पाहुण्यांच्या आगमनाची सूचनाही देतो. ज्ञानेश्वरांच्या एका विरहिणीत, "पैल कोकणाऱ्या काऊ'चे मोठे कौतुक आलेले आहे. हा कावळा पुरेसा मूर्ख आहे. तो आपलीच अंडी समजून कोकिळांची अंडी उबवीत बसतो आणि कामटाळू उनाड कोकिळा आपली गाणी गात हिंडते. कावळा मोठा छिद्रान्वेषी आहे. कुठे छिद्र आहे, व्रण आहे ते पाहून तो बरोबर आपली चोच खुपसतो. दुसऱ्याचे दु:ख उघडणे व त्याची चव घेणे याची त्याला गोडी आहे. तो अशुभ आहे. अस्पृश्य आहे. त्याची लागण पाहणे पाप आहे. माणसांचा अतिशय तिरस्कार करणारा आहे. आपल्या पिलाला माणसाने जरी स्पर्श केला तरी, तो ते मूल मारून टाकतो. या सर्व संकेतांसह अजून दोन प्रमुख संकेत कावळ्याशी जोडलेले आहेत. एक म्हणजे, कावळा तारुण्याचा दूत आहे. स्त्रियांना तो स्पर्श करतो आणि त्या ऋतुस्नात होतात. वर्षानुवर्षे हा कावळा शापित राहतो. तो तारुण्याचा दूत असल्यामुळे पुत्रदाता आहे. दुसरे म्हणजे, हा कावळा यमाचा सेवक आहे. सर्व मृतांच्या पिंडांना तो मृतांच्या वतीने स्पर्श करतो. पिंडाला कावळा शिवल्याशिवाय माणसाला मुक्ती मिळत नाही. असे कावळ्याचे नानाविध संकेत आहेत. कावळ्याच्याबाबत असणारे प्राचीन कथा संदर्भ आणि सांस्कृतिक संकेत यांपैकी शेवते यांना उत्कटतेने जाणवलेला संकेत पिंडाला शिवण्याचा आहे, अगदी न जाणवलेला ऋतुप्राप्तीचा आहे.

 कावळे अतिशय स्पष्टपणे सांगतात की, आम्हाला इतिहास नाही. इतिहास नसल्यामुळे मानेवर परंपरांचे भूतही नाही. परंपराच नाही. अभिमान, क्रोध, दु:खाच्या स्मृती नाहीत. इतिहासाचा पुरावा नाही म्हणून संग्रहालयात ठेवण्याजोगे काहीच नाही. या ठिकाणी कावळा एकाएकी जगातील सर्वसामान्य माणसासारखा होऊन जातो. त्याला वंशपरंपरा आहे. ती खूप जुनीही आहे. पण तीत आठवण्याजोगे काही नाही. पण कावळ्यांनी स्वत:ची ओळख करून देण्यासाठी एक खूण सांगितली आहे, ती म्हणजे कुणाच्या श्राद्धाला आपण हजर असतो.

कावळ्यांच्या कविता / ११३