पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

येऊ लागली की जखमांनी संघटित झाले पाहिजे असे वाटते. 'असे वारे पेटले की सर्व पहाडी शिखरस्थ जमीन-दोस्त झाले' याची नवी स्वप्ने दिसायला लागतात. नदीचे सगळे पात्र पोहून काढल्याप्रमाणे दुःख भोगूनच संपवावे लागते. पण हे दु:ख भोगताना संताप जन्माला येत असतो. मातीचे आयुष्य जगताना मातीचे अश्रू मातीलाच पुसावे लागतात. हा समजूतदारपणा वाटतो. मूठभर चांदण्या मागितल्या हाच गुन्हा झाला असे ज्यांना वाटते त्यांना ते खुशाल वाटो. प्रत्येक पराजयात विजयाचे गर्भोदय होत असतात. आता या कबरी फुटून तडकताहेत, घाईघाईने कुणी तरी आपल्या हातात फिनिक्स पक्ष्यांची रांग कोंबून गेले आहे हे जाणवायला लागते. चकमकीतल्या पराभवात विजयांच्या दिशांचा गर्भ साठलेला असतो. आपला चेहरा सूडाने जेव्हा पेटून उठतो त्या वेळेला दुसऱ्याच्या डोळ्यांतल्या प्रतिबिंबात सुद्धा आपल्याला सूड दिसायला लागतो. 'आज' ज्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या मालकीची सगळी जमीन असली तरी आभाळ आमचे आहे, माती आमची आहे हे ध्यानात येऊ लागते.

 केव्हातरी शब्दांना पंख नव्हते, पावलांना गाव नव्हते, सावलीला नाव नव्हते. आता आभाळ गच्च भरून आले आहे हीच प्रेमातली जाणीव आहे आणि समाज जीवनातलीही जाणीव आहे. तुझे पंख शाबूत आहेत तोवर झेपावून घे- हाच दोन्ही ठिकाणी सल्ला आहे. डोंगरावर चोची मारून आपल्या जखमांना आपणच निमंत्रण देणारे पक्षी प्रेमाविषयी बोलताहेत की समाजाविषयी बोलताहेत हे सांगता येणे कठीण आहे. निर्मनुष्य रस्त्यासारखे आपण दोघेही रिकामे आहोत ही जाणीव जीवनाच्या सर्वच कक्षांना व्यापणारी आहे. शंख आणि शिंपल्यांच्या माऱ्याने वाळूला जखमा होत नाहीत, नुसते संग्रहालय उभे राहते आणि जखमाच वाचायच्या असल्या तर त्यासाठी इतिहास वाचावा लागत नाही, भोवतीचे चेहरे वाचणे पुरे असते.

 श्रीपाद जोशींच्या कवितेला राजकारणाचा सोस नाही. ती मुद्दाम राजकारणात शिरत नाही. पण म्हणून तिला राजकारण वर्म्यही नाही. राजकारणच काय, इसापनीती आणि पंचतंत्र यांच्यातल्या गोष्टीही वय॑ नाहीत. मधून मधून या कविता एखाद्या छोट्या गोष्टीसारख्या होऊन जातात. पक्ष्याच्या पंखांचे वेड लागलेल्या जमातीला त्यांच्या थव्यातीलच एखादा समजदार अनुभवी पक्षी तडजोडीची कारणे सांगू शकतो. कारण त्याला झाडांच्या फांद्यांवर पाय टेकायचे असतात. ज्या जगात प्रत्येकाच्या भिंती निराळ्या, नुसत्या जखमाच निराळ्या नाहीत तर त्या जखमांच्या खपल्या निराळ्या, त्या जगातल्या पक्ष्यांना साऱ्यांनी

१०८ / थेंब अत्तराचे