व्हावी लागत नसते. घराची धर्मशाळा झाली तरी पुरे. आणि जेव्हा सगळे कोसळत असते त्यावेळी त्या कोसळण्याचे आपण केवळ साक्षीदार नसतो, तर कलथून गेलेल्या खांबाखाली चिमटून गेलेले आपणच असतो.
प्रेमात काय किंवा माणसांच्या समाजात काय हा कवी गुंतत जातो. त्याची गुंतण्याची इच्छा नसते. असे गुंतत जाण्यासाठी आपण गुंतलो नव्हतो, पाण्याखाली संसार थाटण्याची आपली मनीषा नव्हती तरी आपण गुंतत गेलो, गुंतायचे नाही असे जरी आपण म्हटले तरी सोनचाफ्यांच्या फुलांची राख पापण्यांच्या आडोशाला उरतेच. हे गुंतणे ही एक मनाची नित्य प्रक्रिया आहे. माणसांच्यामध्ये गुंततानाच माणूस समाजात गुंतत जातो. आणि माणसात गुंततानाच तो प्रेमात गुंतत जातो. या दोन्हीही ठिकाणी निर्भेळ दुःखाचे व निराशेचे क्षण मधून मधून येतातच. सूर्यास्ताच्या वेळेला पाणी अधिकच काळे काळे दिसायला लागते. जलाशयाचा ऊर पाहता पाहता काळोखाने भरून जातो. कवीलाही असे वाटते की, आपण सूर्यास्ताच्या पाण्याचा थेंब झालो आहोत, अंधाराच्या क्षितिजाचा आपण कोंभ झालो आहोत, झाड फुलून येण्याच्या ऐवजी ते फुटून पानगळच सुरू झाली आहे, आपण या पानगळीचे उदास पान झालो आहोत. सुकलेल्या डहाळीवरचा पंख तुटलेला पक्षी संपणाऱ्या प्रकाशाचे काजव्याप्रमाणे लुकलुकणारे कण आपल्या वेदनांना गोंजारीत पाहत असतो. तो वाट पाहतो आहे अंधाराची. या अंधारात काय मिळणार? अंधारात व्यथेला उत्तर सापडणार आहे का? कवीही तसे म्हणत नाही; पण निदान अंधारात आपण स्वत:च्या-सकट हरवून जातो, हे सुद्धा भाग्यच म्हणायला पाहिजे.
ही निराशासुद्धा कायमची नसते. निराशेच्या लाटा उसळत असतानाच सगळा क्षोभही उमळून येतो. या क्षोभाच्या तडाख्यात सखे-सखया ही सगळी संबोधने एकदा संपवून टाकावीत असे वाटायला लागते. ज्यांची ज्यांची आशा केली ते सगळे नव-नवा अंधारच प्रसवीत राहिले. दिव्याला प्रकाश फुटून यावा त्याऐवजी दिवा अंधार वाढवू लागला, आणि प्रत्येक दिव्याच्या पेटण्यामधून विझून गेलेल्या आशांचा टाहोच जर ऐकू येऊ लागला तर मग त्या कडवटपणाला सीमा नसते. चांदण्याला उगीचच खोल पुरण्याची काही गरज नाही. पालख्या जर रिकाम्या असतील तर मग चांदणे स्वत:च काळवंडून जाऊन उदासच झालेले असते. अशा वेळी नुसत्या निराशेत थांबणे शक्य नसते. सगळा संताप उफाळून बाहेर येऊ लागतो. वादळांची चिन्हे दिसायला लागतात. सगळीच वादळे घोंगावून गर्जना करीत येतातच, असे नाही. पण वादळे येत असतात. ही वादळे एकदा