पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळून एकत्र उडावे अगर फसूच नये हे सांगण्यात काय अर्थ असतो? 'चला आता आपण फसू या' - म्हणून कुणी फसत नाही आणि केवळ आपण फसलो आहोत म्हणून अस्तित्व टिकवण्यासाठी जे एकत्र येतात ते फारसे काही निर्माणही करू शकत नाहीत. 'दुसरे स्वातंत्र्य' म्हणून ज्या घटनेकडे आपण मोठ्या आशेने पाहिले त्या घटनेची लक्तरे लोंबताना आपल्याला दिसत आहेत. पहाता पहाता सगळे काही जागच्या जागी कुजून, नासून गेले आहे. काही कविता या अशा राजकारणातील भ्रमनिरासही सांगणाऱ्या आहेत.

 क्षोभ आणि क्रांती, आशा आणि उत्साह, चीड, उद्वेग आणि भ्रमनिरास, वैफल्य आणि अगतिकता या सर्व वलयांच्या मधून श्रीपाद जोशींची कविता जात असते. ती कोणत्याच भोवऱ्यात सापडून जागच्या जागी फिरत नाही आणि चंचलपणे सगळ्याच खांबांना शिवून यायचे आहे म्हणून मुद्दाम इकडून तिकडे पळतही नाही. सर्वच लाटांशी खेळत जे जाणवते ते मुक्तपणे सांगत ही कविता उमलत जाते. आपण गद्य आहोत की पद्य आहोत याचीही फारशी फिकीर न करता आपण साचलेपणात न अडकता वाहतो आहोत, खळाळतो आहोत यातच स्वत:चे महत्त्व समजणारी ही कविता आहे. म्हणून या कवितेत अखंड विसंवादी सूर आणि सर्व विसंवादांना सामावून घेणारी सलगता या दोहोचाही एक आकृतिबंध सिद्ध झालेला आहे. यातच या कवितेचे वैशिष्ट्य आहे.

 श्रीपाद जोशींच्या कवितेविषयी अजून एक दोन बाबींच्याकडे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे. पहिली बाब म्हणजे ही कविता एकाच वेळी उग्र, आक्रमक आणि धूसर, गुंतागुंतीची अशी दुहेरी वळणं गिरविण्याचा प्रयत्न करीत आहे. सामाजिक जाणिवांच्या अभिव्यक्तीत जे उग्र आणि आणि आक्रमक असते ते स्पष्ट आणि एकेरी सुद्धा असते. सत्य विरुद्ध असत्य, न्याय विरुद्ध अन्याय, बरोबर विरुद्ध चूक अशी दोनच टोके आदेश देणाऱ्या आक्रमक कवितेला माहीत असतात. आणि जे गुंतागुंतीचे आणि धूसर होत जात असते ते आपली गती गमावून बसते. गुंतागुंत न गमावता आवेशयुक्त होण्याची ही धडपड कधी कधी शब्दांशी खेळत जाते. जमीन तुमची असली तरी आभाळ आमचे आहे, नाती तुमची असली तरी माती आमची आहे, आम्हालाही ओठ आहेत, आम्हालाही पोट आहेअसल्या प्रकारच्या लयबद्ध रचनांच्या मधेच, तुमच्याही आतड्यांना जगण्याच्या वेदना कळतील- अशी एक तिरपे वळणे घेणारी ओळ असते. क्रांतीचे शब्द वांझ ठरतील, तुमच्या शरीरावरून ऋतू गळून जातील हे सांगतानाच चोरून आणलेल्या चांदण्या लपवण्यासाठी सूर्य पेरला नाही तर तसूभर जागाही मिळणार नाही

सळाळ / १०९