एक चमत्कारिक दुभंगलेपणा म्हटला पाहिजे. एकाच मनात एका वेळी कडवटपणा आणि स्वप्नाळूपणा नांदत असतो. वेगवेगळ्या क्षणी एकच माणूस हळवा आणि कडवट होतो. प्रेमाच्या राज्यात स्वप्नाळूपणाचे क्षण आहेत, तसे हळवेपणाचे, कडवटपणाचेही क्षण आहेत. हे सर्वच क्षेत्रांतील अनुभवाला लागू आहे. श्रीपाद जोशींच्या कवितेत मला हा सलगपणा एक महत्त्वाचा विशेष म्हणून जाणवतो. आभाळाचा एकच तुकडा जर प्रेयसी जपायला शिकली असती आणि वाळूच्या क्षणभंगुर घरावर जर ती उघड्या डोळ्यांनी साज चढवू शकली असती तर वादळाच्या लाटा किनाऱ्यावरच थोपवून धरता आल्या असत्या. माणसाला जपण्याची एक खोड असते. मिळालेला क्षण सर्व शक्तीने बेभानपणे उपभोगता येणे विसरण्यापेक्षा आपल्या ओंजळीतील फुले जपण्याचा आपण प्रयत्न करतो. या प्रयत्नात फुले उमलण्याऐवजी जागच्या जागी सुकून जातात. ज्यांना आभाळाचा तुकडा जपताच येत नाही त्यांना कदाचित व्यवहार सांभाळून सुखाने व्यवस्थित संसार करता येईल, पण त्यांना प्रेम करता येईलच असे नाही असे कवीला वाटते. हे वाटत असताना मधूनच स्वत:विषयी, आपले पंख चेपले गेलेले आहेत, याची त्याला जाणीव आहे.
आपल्याला पंख आहेत ही जाणीव तर महत्त्वाची आहेच, पण हे पंख चेपले गेलेले आहेत ही वेदना जाणवणेही महत्त्वाचेच आहे. आपल्या अगतिकतेचे ज्याला कधी भानच आले नाही तो स्वप्नाळू माणूस जमिनीवर पाय न टेकलेला असतो. जमिनीवर घट्ट पाय रोवून वास्तवाशी इमान राखून सुद्धा आपल्या मनातली स्वप्ने ज्यांना जपता येतात त्यांच्याच स्वप्नांना दिशा सापडण्याचा संभव असतो. हातात हात घालून जगणाऱ्या चोची एकाएकी पांथस्थासारख्या अनोळखी वाटतात, घराच्या धर्मशाळा होतात, कोसळणाऱ्या आभाळांचे इतिहास कलथून गेलेल्या खांबाखालच्या पंख चेपलेल्या पक्ष्यांनाच जपावे लागतात. आभाळ कोसळण्याची दवंडी पिटण्यात अर्थ नसतो. कारण कोसळण्याला शब्द नसतात. बालकवीच्या कवितेत धर्मशाळा उद्ध्वस्त होतात, खांब कलथून जातात आणि पक्षी खिन्न, नीरस एकांत गीत गातात. या ठिकाणी उद्ध्वस्तपणाच्यापेक्षा पारखेपणाला जास्त महत्त्व आलेले आहे. चोचीत चोच घालून जगणारे त्यानंतरही एकमेकांच्या सहवासात आणि शेजारीच असतात. पण ते रस्त्याने जाणारे, शरीराने जवळ असणारे, परस्परांना अनोळखी झालेले पांथस्थ होऊन जातात. हा दुरावा मनाचा आहे. हा मनाचा दुरावा निर्माण झाला की घरच धर्मशाळा होते, माणूस उद्ध्वस्त होण्यासाठी धर्मशाळा उद्ध्वस्त