Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाहाणार असल्यामुळे उल्हसित आणि उत्सुकही असणार. या आंगणाच्या सारखेच कवीचे मन आहे. या कवीच्या मनात पेटण्याची वाट पहात धुमसत असणारा सूड आहे. त्याचप्रमाणे वैताग आहे. निराशा आहे, तशी भोळी आशाही आहे आणि या सगळ्यांच्या शेजारी व्यथित करणारे, न सुटणारे प्रश्न आणि त्यांच्यापासून आरंभ होणारे प्रश्नायन व प्रश्नपर्व आहे. या प्रश्नांच्या हातात हात घालून उभी असणारी एक सुगंधी कळही आहे. सूर्याची असंख्य वलये मोजीत आलेले वाळूचे कण आणि अशा शेकडो वलयांनी एकाच वेळेला भारले जाऊन वलयांकित झालेले कवीचे मीपण सुद्धा आहे. हे वलयांकित मीपण आणि रांगोळ्या रेखलेले, पणतीची वाट पहाणारे आंगण हे सगळेच एकाच वस्तूचे पुन्हा पुन्हा होणारे दर्शन आहे. ती वस्तू म्हणजे फुलून उमलून आलेले आणि जखमांनी भरून गेलेले असे कविमन आहे. या कवीला पंख असल्याची आणि ते कापले गेल्याची एकाच वेळेला संकीर्ण जाणीव आहे.

 जीवनात उत्कट भाबडेपणालाही काही अर्थ आहे. ज्या भोळ्या मनाला पाश, कंगोरे आणि निखारे यांचा अजून पत्ताच नसतो असा पंख पसरून आकाशात झेपावू पाहणारा पक्षी आपल्या मनात थांबलेला असणे, यालाही काही अर्थ आहे. काही पाखरांना गर्द निळ्या रंगाचे बंधमुक्त पंख असतात. काही पाखरांच्या चोचीत फक्त हिरव्या फांद्यांचीच स्वप्ने असतात. जगाला फक्त सोनेरी खांब आहेत इतकेच ज्ञान असणारी काही पाखरे असतात. हे सारे भाबडेपणानेच जगण्याला अर्थ दिलेला असतो. म्हणूनच स्वप्नांना अर्थ असतो. या स्वप्नांचे वेड काही जणांना लागलेले असते. या स्वप्नाळूपणाला लाख कळ्यांचा बहर आलेला असतो. त्यावेळी आपल्या प्रेयसीने पण स्वप्नमय होऊन यावे, याची कवी वाट पाहतो. तो स्वत:च पिसारा फुलवून नाचणारा मोर धरीत असतो. नवनव्या स्वप्नांची मोरपिसे या पिसाऱ्यात सामावून घेण्याची त्याची इच्छा असते. त्याला ओंजळीत धरायला मूठभर चांदण्या लागतात, प्रकाशाची शेती करण्याची त्याची इच्छा असते. असल्या प्रकारचा भोळा, हळवा आभाळाचा तुकडा सर्व उजाड आणि उद्ध्वस्त प्रदेशातून वावरत असताना आग्रहाने जतन करणे ही गोष्ट निरर्थक नसते. या संचितामुळेच आपल्या क्षोभाला अर्थ प्राप्त होणारा असतो.

 कविमनातील हळवेपणा आणि स्वप्नाळूपणा हा त्याच्या प्रेमविषयक जाणिवेपासून सामाजिक जाणिवेपर्यंत अखंड राहतो ही माझ्या दृष्टीने चांगली व महत्त्वाची बाब आहे. तुम्ही-प्रेम करताना हळवे आणि स्वप्नाळू होणार आणि समाजाचा विचार करताना मात्र कडवट आणि व्यवहारवादी होणार, हा मनाचा

सळाळ / १०५