पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या ध्येयमार्गावरून चालावे लागते. यंत्राचा सरधोपटपणा राजकारणातही अपुरा पडतो. कवितेला तर साऱ्या एकसुरीपणाची धास्तीच बाळगली पाहिजे. नगर्सेकरांनी हे सारे जाणलेले आहे. म्हणूनच ते कवी झाले नाही तर फक्त प्रचारकच तेवढा बाजारात ठरीव माल विक्रीसाठी घेऊन उभा राहिलेला असा आढळला असता. कवी आणि प्रचारक यांच्यातील फरकच हा असतो.

 या साऱ्या जाणिवा आपल्या कवेत साठवून घेऊन हा कवी व्यवस्थेविरुद्ध भांडणास उभा राहिलेला आहे. आपले भांडण व्यवस्थेशी आहे. माणसाशी नाही यावर त्याचा विश्वास आहे. पण व्यवस्था म्हणजे सुद्धा एक नाही. राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक असा परस्परावलंबी व्यवस्थांचा एक समूह आहे. या व्यवस्थासमूहांचे परस्परावलंबन न ओळखणे आणि त्यांना सुटे समजणे धोक्याचे आहे. आर्थिक व सामाजिक प्रश्न बाजूला काढणे व फक्त सामाजिक प्रश्न सोडवता येतील असे मानणे भ्रमाचे आहे. या भ्रमात जे सापडेल त्यांना प्रश्न सोडविण्यात यश आलेच नाही. येणेही शक्य नव्हते. पण अशी अशास्त्रीय अपयशे जे सर्वांगीण क्रांतीसाठी धडपडत होते त्यांना अडथळा ठरली. वारंवार जे किल्ले जिंकले ते बेसावधपणात ढासळून गेले. आणि विजयाच्या खाणाखुणाही नामशेष झाल्या. सावध राहण्याचे इशारे नाकारून जे बेसावध राहिले त्यांनी आपला जय गमावला. पण हे सारे मानले तरी नव्याने आपला प्रवास करणे भाग आहे.

 क्रांतीची स्वप्ने पाहणारांना स्वप्ने पाहताच विचार करणे भाग असते. विचार करताना अनुभव घेणे भाग असते. हा भन्नाट विचार वादळासारखा डोक्यात घोंघावत असतो. त्या क्रांतीच्या विचारांची ही कविता आहे. हे विचार आपले पंख कापणार नाहीत तर पंखांना नवे बळ येतील. आपली पावले खिळे ठोकून पांगळी करणार नाहीत तर पायांना बळ देतील. या विश्वासावरच डोक्यातील वादळात स्वत:ला पुन: पुन्हा हरवणे आणि शोधणे चालू असते. या प्रवासाची एक ओळख गाथा म्हणजे नगर्सेकरांची कविता.

 सुरेश नगर्सेकरांनी आपल्या कवितेच्या बळावर पहिल्या संग्रहाच्या रूपाने जे स्थान मिळविले होते, त्यात ही नवी आणखी भर पडली आहे. कामगारांची ही कविता सर्व मराठी कवितेचाच, समृद्धतेचाच एक पदर आहे. मी या कवीला आणि कवितेला तर शुभेच्छा देतोच पण ज्या भूमिकेतून ही कविता जन्माला येते त्या वैचारिक जाणिवेलाही शुभेच्छा देतो.

***

विद्रोह / १०१