Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४. सळाळ


- श्रीपाद भालचंद्र जोशी

 कोणत्याही कवीची कविता वाचताना माझ्या मनात सारखा डोकावत असणारा प्रश्न, हा कविमनाविषयी असतो. सर्व सामान्यांच्यापेक्षा कवीचे मन अधिक संवेदनाक्षम असते हे तर खरेच. पण सर्वसामान्यांच्यापेक्षा अर्थपूर्ण तपशील मनात जतन करण्याच्या दृष्टीने सुद्धा कविमन अधिक दक्ष असते, असे मी मानतो. यामुळे एखादा कवी फक्त निसर्गसौंदर्याची गीते गाऊ लागला म्हणजे माझ्या मनात प्रश्न येतो, माणसांच्या जगात वावरणारा हा माणूसयाला माणसांच्याविषयी काहीच वाटत नाही असे मानावे की, माणसांच्या विषयी आपल्याला जे काही वाटते ते कवितेत येऊ द्यायचे नाही असा निर्णय घेऊन जाणीवपूर्वक साचेबंदपणा कवीने स्वीकारलेला आहे असे मानावे, हे मला ठरवता येत नाही. हा प्रश्न नुसता निसर्गगीतांच्यापुरता नाही, सामाजिक जाणिवांनी भारलेली कविता वाचतानासुद्धा या माणसाला कधी जीवनातल्या इतर जाणिवा जाणवल्याच नाहीत की काय? हा प्रश्न माझ्या मनाला चाटून जातो. ज्याला जीवनातले हास्य आणि सुख कधी जाणवलेच नाही त्याला दु:खाचा अर्थ कळू शकेल काय? किंवा ज्याला वेदना कधी जाणवलीच नाही त्याला सुखाचा अर्थ कळू शकेल काय? याविषयी मी साशंक असतो. मानवी मनाची आणि जीवनाची विविधता व समृद्धी ज्यांनी जाणीवपूर्वक आपल्या अभिव्यक्तीकक्षेच्या बाहेर ठेवलेली आहे त्या मंडळींच्या वाङ्मयीन प्रामाणिकपणाविषयी माझी खात्री सहजासहजी पटत नाही.

 असेही कवी आहेत जे वर्षांनुवर्षे एका विशिष्ट प्रकारच्या अनुभवाचा शोध घेत आले आहेत. पण पुन्हा त्या ठिकाणी असे दिसते की, जवळ जवळ एकसारखा दिसणारा अनुभव, त्याचे एकसारखे दिसणे खोटे आहे. सारखेपणाच्या पापुद्र्याखाली प्रत्येक अनुभवाचे निराळेपण लपलेले आहे. त्या अनुभवांच्या वेगवेगळ्या छटा, त्या अनुभवांत असणारी गुंतागुंत, प्रत्येक अनुभवाचे निराळेपण

१०२ / थेंब अत्तराचे