पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. श्वापदांचे पाप माथी लागलेले आहेत, वास्तवाची बंधने पायात आहेत. झुंजणारी वाट हुंदक्यांनी भरलेली आहे. या वर्तमानाला एक अर्थ असतो. उद्याच्या स्वप्नांना एक अर्थ असतो. जर स्वप्ने इतकी सहज असतील की त्यांच्यासाठी पिढ्या बर्बाद करण्याची गरज नसेल तर स्वप्नांचा सोपेपणा आजच्या यातनांचा अर्थ काढून घेतो. स्वप्नांना भव्यता आहे म्हणून वर्तमानाच्या वेदनेला अर्थ आहे आणि या ताणाला महत्त्व आहे. या सांध्यावर कवी उभा आहे. म्हणूनच समाजवादी कवीसाठी हात हातात असण्याला अर्थ असतो.

 ही मनोहारिणी स्वत:च कधी अभ्यासिका व चिंतनाभिमुख असते. ती अभ्यासिकेत जीवनाचा अन्वयार्थ लावीत बसलेली असते. ती वृक्ष न्याहाळीत असते. पराजित होऊन जमिनीवर पडलेल्या वेलींना पुन: वृक्षावर चढवीत असते. ती लोकरही विणीत बसलेली असते. साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडीत, सारी कामे करीत ती पुन: जीवनाचा अर्थ लावण्यातही गढलेली असते. छायाचित्र घ्यायचेच तर तिचे घ्यावे असे कवीला वाटते. कधी या प्रियेला तू समजतेस तितके काहीही सोपे नाही हेच समजावून सांगावे लागते. आणि समजावून सांगणेही सरळ सोपे नसते. साहसीपणात उगीचच स्वत:ला रक्ताळून घेणेही टाळायचे आणि सावधपणात मूळ सूरही विसरावयाचा ही दोन्ही टोके टाळून आपले कोसळते घर सावरणेही कठीण असते. हे समजावून सांगणेही कठीण असते. पण ते केले तर पाहिजेच.

 भोवताली फक्त प्रेयसीच आहे असेही नाही. मायही आहे. मध्येच भांबावलेले सखे व मित्रही आहे, त्यांच्याही व्यथा जाणणे भाग आहे. व्यथांना जाणीतच कवितेचा प्रवास होत असतो. माणसाचा दुबळेपणा ज्यांनी जाणला नाही ते कवी होऊ शकत नाहीत. यादृष्टीने स्लोगन्स ही कविता पाहण्याजोगी आहे. स्लोगन्स माणसाचा पाठलाग करतात. सत्य असे आहे की, ज्यांचे मन स्लोगन्समध्ये गुंतलेले आहे, स्लोगन्सवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांचाच पाठलाग घोषणा करतात. घोषणांवर ज्याची श्रद्धा नाही ते शांतपणे स्लोगन्स आपल्या उपजीविकेसाठी धंदा म्हणून वापरतात. ज्यांचा स्लोगन्सवर विश्वास नाही त्यांची अडचण नसते. ज्यांचा विश्वास आहे पण जे कौटुंबिक दायित्वामुळे दुबळे झालेले आहेत त्यांची अडचण असते. या दुबळेपणाचा उपहास करावाच लागतो. पण हा दुबळेपणा समजूनही घ्यावा लागतो. हजार नात्यांनी जखडलेल्या माणसांजवळ हा दुबळेपणा नसता तर मग कदाचित माणूस यंत्रच झाला असता. तो माणूस राहिला नसता.

 जीवनातील सर्व नाती न्याहाळीत, योग्य ठिकाणी त्यांचा आदर करीत, सर्व दुबळेपणा समजून घेत आपले कोण व शत्रू कोण याची खात्री पटवून घेत कवीला

१०० / थेंब अत्तराचे