पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही, हे मात्र खरे नाही. समाजवादी कवीलाही त्याचे व्यक्तिगत जीवन असतेच. आपल्यावरील प्रेमाखातर ज्यांनी विनातक्रार दुःखभोग मान्य केलेला आहे त्यांची नोंद मनात असतेच. रात्री उशिरापर्यंत घरी जाऊ न शकणारा कार्यकर्ता अनेक अंगांनी आपल्या पत्नीवर अन्याय करीत असतो. स्वयंपाक ताजा करावयाचा व तो थंड शिळा करून खायचा हा अन्यायच आहे. आपले दिवसभराचे थकलेपण बाजूला सारून वाट पाहात थांबावयाचे आणि आणि हा उशिरा घरी परतणारा पती थकून आलेला असणार हे मनाने जाणून तो येताच फक्त जेवणास वाढायचे. चर्चा न करता त्याला झोपू द्यायचे. आणि या अशा थकून आलेल्या, समाजाला वाहिलेल्या पतीला आपला समजून त्याच्या स्वाधीन व्हायचे. या कार्यक्रमात त्या घरवालीवर फार मोठा अन्याय होत असतो. पण तिने तो स्वेच्छेने स्वीकारलेला असतो. कवीला हाही अनुभव सांगणे भाग असते. प्रतीक्षा म्हणजे केवळ वाट पाहणे नसते. नानाविध शंकांचे काहूर उसळलेले असते. नगर्सेकरांनी त्या काहुराचे वर्णन 'दगड ठेवल्यागत श्वासाला कंप होता' असे केले आहे. यातील श्वासाला कंप ही भीती, साशंकता आणि दगड ठेवल्यामुळे येणारी स्थिरता व ओझे दोन्हीचाही एकत्र अनुभव घेतला पाहिजे. वाट पाहताना नाना अनिष्ट सुचविणारी गल्लीतली कुत्री ओरडत असतात. तर अपुरी विश्रांती संपवून उठणे भाग असते त्यावेळी मुल्लाची बांग हाक देत असते. या तापांमध्ये जी टिकाव धरून उभी राहू शकते ती कार्यकर्त्याची पत्नी आणि याही अभावात जिच्या श्वासांना फुलांचा गंध लगडलेला राहतो ती प्रेयसी. या प्रेयसीचे आभार वगैरे मानण्याचा उपचार पाळण्याची गरज नसते. आणि तिला किती अडचणींतून जीवन जगावे लागते यावर विव्हळुन व्याख्यानही देण्याची गरज नसते. खरे महत्त्व ही साथीदारीण ओळखणे, जाणणे, तिचे महत्त्व जाणणे याला असते.

 ही प्रेयसी एकाच रूपात भेटते असे नाही. तिच्याही रूपांना विविधता आहे. असलीच पाहिजे. या इथे सगळ्या स्मृतीचा श्वास आहे असे सांगून माझ्या हातात तिचा हात आहे इतकेच सांगून कामगार कवीला थांबता येत नाही. कारण या हातात हात असण्याला अर्थ देणारी घटना रुतलेली नाव ओढण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नामुळे अस्तित्वात येते. नभात तेवणारा नवा तारा उदयाला येत आहे याच्या जाणिवेमुळे अर्थ निर्माण होतो. जीवनाची सार्थकता स्वत:ला स्वत:साठी काही मिळविण्यात नसून व्यवस्था बदलण्याच्या धडपडीत ती सार्थकता आहे हे ज्यांनी मानले त्यांच्यासाठी केवळ हाती हात असणे पुरणारे नाही. वर्तमानाच्या क्षणाला वेदनेचा डंख

विद्रोह / ९९