या यातनामय प्रदेशाला एकदा प्रदक्षिणा घालणे भाग असते. कवी ही प्रदक्षिणा कशी घालतील हे पाहण्यास मी उत्सुक आहे. मॅक्झीम गॉर्कीचे मोठेपण अशी प्रदक्षिणा घालण्यात होते. मराठीत कुणाला तरी योग यावा अशी इच्छा आहे. पण हा योग येणार कुणाला? सूर्यकुलाच्या कवितेच्या प्रवाहात असणाऱ्यालाच हा योग येणार. इतरांना तर हा योग येणारच नाही. 'ते असे का वागतात, हेच मुळी समजत नाही', हे म्हणणे फार जणांच्या बाबतीत खरे आहे. फक्त स्वत:च्या विनाशाची वाटचाल करण्यापुरतेच हे खरे नाही.
आपण खरे जगत गेलो आणि घडत गेलो आहो. या घडण्या, जगण्यामुळेच आपण माणूस ठरलो आहो. जर असे आपण जगलो नसतो तर आपल्या अस्तित्वाला आणि कवितेलाही अर्थ उरला नसता. दाही दिशा सुसाटत जाणारे शब्द आणि पाना-पानांवर नव्या आशा पेरणारे शब्द आपणाजवळ आहेत. कारण असे आपण जगतो आहोत. या जगण्याच्या प्रवासात अनेकजण समजूतदारपणे निराश होणे कसे जरुरीचे आहे हे समजून देतातच. सणासुदीचे जेवण नाकारून ध्यानस्थपणे त्या पलीकडचे-दूरचे काहीतरी न्याहाळणाऱ्यांना त्यांचा वेडेपणा समजावून देणारे असतातच. या समजूतदार मंडळींच्या जवळ अतिशय वेगाने हताश होण्याची फार मोठी क्षमता असते. सूर्य कधीचाच मावळन गेलेला आहे. आणि काळ्याशार अंधाराशी भरगच्च नदी वाहत राहण्यापेक्षा आता काही घडणारच नाही याची खात्री पटवन देणारे असतात. त्यासाठी भरघोस युक्तिवाद नेहमी सिद्ध असतात. आपण शहाणे आहोत कारण फार लौकर आपण निराश झालो, असा त्यांचा दावा असतो. इतरांना स्वत:सारखे शहाणे करण्याचा अखंड यत्न चालू असतो. या साऱ्या हताश होण्याचा जन्मसिद्ध हक्क सांगणाऱ्या सभ्य माणसांना दूर ठेवून आपण आपल्या स्वप्नांसाठी स्वप्नांसह जगतो याचा रास्त अभिमान या कवीला आहे. हा कवी पराभूत होण्याचे शहाणपण हट्टाने नाकारून सतत झुंजत राहण्याचे वेडेपण आग्रहाने जतन करणारा आहे. कामगाराच्या कवीला हे वेडेपण जपणे भागच असते. नाही तर तो मध्यमवर्गीय शहाणा कवी होतो. कुटणारे आणि कुंथणारे यांचे जिवंतपण मी नाकारणार नाही. पण तेच तेवढे असून लढणारे मात्र जिवंत नाहीत असे करंटे निर्णय मी देणार नाही. त्यांच्या कवितेचे कविता असणे त्यांनी नाकारलेले नाही. आमच्या कवितेचे कविता असणे त्यांनी नाकारलेले आहे.
समाजवादाला निष्ठा वाहिलेला कवी क्रांतीची वाट पाहतो व परिवर्तनाचा विचार करतो हे खरे आहे. पण याखेरीज जीवनात असणारे दुसरे काही जाणवतच