पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७९

अनंता काय वाहूं ॥ ६ ॥ तुका ह्मणे मज अवघे तुझे नाम ।
धूप दीप रामकृष्णहरि ॥ ७ ॥

  ३१०. बहु नांवें ठेविलीं स्तुतीचे आवडी । बहुत या
गोडी आली रसा ॥ १ ॥ बहु सोसे सेवन केलें बहुवस ।
बहु आला दिस गोमट्याचा ॥ २ ॥ बहुतां पुरला बहुतां
उरला । बहुतांचा केला बहु नट ॥ ३ ॥ बहु तुका झाला
निकट वृत्ती । बहु काकुलती येऊनियां ॥ ४ ॥

  ३११. आडलिया जना होसी सहाकारी । अंधळिया
करीं काठी तूंचि ॥ १ ॥ आडिले गांजिले पीडिले संसारीं ।
त्यांचा तू कैवारी नारायणा ॥ २ ॥ प्रल्हाद महा संकटी
रक्षिला । तुह्मीं आपंगिला नानापरी ॥ ३ ॥ आपुलेंची अंग
तुह्मीं वोडविलें । त्याचे निवारले महा दुःख ॥ ४ ॥ तुका
ह्मणे तुझे कृपे पार नाहीं । माझे विठाबाई जननीये ॥ ५ ॥

  ३१२. कृपावंता कोप न धरावा चित्तीं । छळू वक्रोक्तीं
स्तुती करूं ॥ १ ॥ आह्मी तुझा पार काय जाणों देवा ।
नेणों कैसी सेवा करावी ते ॥ २ ॥ अनंता अरूपा अलक्षा
अच्युता । निर्गुणा सच्चीता सर्वोत्तमा ॥ ३ ॥ चांगली ही
नामें घेतली ठेवून । जालासी लहान भक्तिकाजा ॥ ४ ॥
तुका ह्मणे तुझ्या पायांवरी सदा । मस्तक गोविंदा
असो माझा ॥ ५ ॥

  ३१३. एकांताचे सुख देई मज देवा । आघात या जीवा
चुकवूनी ॥ १ ॥ ध्यानीं रूप वाचे नाम निरंतर । आपुला
विसर पडों नेदीं ॥ २ ॥ मायबाळा भेटी सुखाची आवडी ।

__________________________________________

१ सोंग, २ कुशब्दांनी.