पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



६७

  २७८. कन्या सासुऱ्यासी जाये । मागे परतोनी पाहे
॥ १ ॥ तैसें जालें माझ्या जीवा । केव्हां भेटसी केशवा
॥ २ ॥ चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥ ३ ॥
जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी ॥ ४ ॥

  २७९. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी
बंधु चुलता कृष्ण माझा ॥ १ ॥ कृष्ण माझा गुरु कृष्ण
माझे तारूं । उतरी पैलपारु भवनदीची ॥ २ ॥ कृष्ण
माझे मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा
॥ ३ ॥ तुका ह्मणे माझा श्रीकृष्ण विसांवा । वाटे न
करावा परता जीवा ॥ ४ ॥

  २८०, आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा झाली
धणी ॥ १ ॥ अंतरीं पापाच्या कोडी । वरीवरी बोडी डोई
दाढी ।। २ ॥ बोडिले ते निघालें । काय पालटले सांग
वहिलें ॥ ३ ॥ पाप गेल्याची काय खुण । नाहीं पालटले
अवगुण ॥ ४ ॥ भक्तिभावेंविण । तुका ह्मणे अवघा शीण ॥ ५ ॥

  २८१. मोलें घातले रडाया । नाहीं असू आणि माया
॥ १ ॥ तैसा भक्तिवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ २ ॥
वेठी धरिल्या दावी भाव । मागे पळायाचा पाव ॥ ३ ॥
काजव्याच्या ज्योती । तुका ह्मणे नलगे वाती ॥ ४ ॥

  २८२. गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा
॥ १ ॥ कैचे पुण्य तिचे गांठी । व्रते वेची लोभासाठीं
॥ २ ॥ वाढावें संतान । गृहीं व्हावें धनधान्य ॥ ३ ॥

________________________________________

१ राशी, २ पहिलें. ३ पति. ४ स्त्री.