पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



६४

  २६६. त्रैलोक्य पाळितां उबगला नाहीं । आमचे त्या
काई असे ओझे ॥ १ ॥ पाषाणाचे पोटीं बैसला दर्दूर ।
तया मुखीं चारा कोण घाली ॥ २ ॥ पक्षी अजगर न करी
संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥ ३ ॥ तुका ह्मणे तया
भार घातलिया। उपेक्षीना दयासिंधु माझा ॥ ४ ॥

  २६७. काय देवापाशीं उणें । हिंडे दारोदारी सुनें
॥ १ ॥ करी आक्षरांची आटी। एके कवडीच साठीं ॥ २ ॥
निंदी कोणां स्तवी । चिंतातुर सदा जीवीं ॥ ३ ॥ तुका
ह्मणे भांड । जळो जळो त्याचे तोंड ॥ ४ ॥

  २६८. आलें देवाचिया मना । तेथे कोणाचे चालेना
॥ १ ॥ हरिश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरी पाणी ॥ २ ॥
पांडवांचा साहाकारी । राज्यावरोनि केले दुरी ॥ ३ ॥
तुका ह्मणे उगेचि राहा । होईल ते सहज पाहा ॥ ४ ॥

  २६९. माझे मागणे ते किती । दाता लक्षुमीचा पती
॥ १ ॥ तान्हेल्याने पीतां पाणी । तेणें गंगा नव्हे उणी
॥ २ ॥ कल्पतरु झाला देता । तेथे पोटाचा मागता ॥ ३ ॥
तुका म्हणे संता ध्यातां । परब्रह्म आलें हातां ॥ ४ ॥

____
३२.भक्ती.

  २७०. पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या
॥ १ ॥ बांधु विठ्ठल सांगडी । पोहुनि जाऊ पैल थडी ॥ २ ॥
अवघे जन गडी । घाला उडी भांईनो ॥ ३ ॥ हें तो नाहीं
सर्वकाळ । अमुप अमृताचे जळ ॥ ४ ॥ तुका ह्मणे थोरा
पुण्यें । ओघ आला पंथे येणें ॥ ५ ॥

__________________________________________

१ सांठा,