पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



६३

वाढवी श्रीपती सवें दोन्ही ॥ २ ॥ फुटती तरुवर
उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥ ३ ॥ तेणें
तुझी काय नाही केली चिंता । राहे त्या अनंता आठवून ॥ ४ ॥

  २६२. नित्य उठोनियां खायाचीच चिंता । आपुल्या तू
हिता नाठवासी ॥ १ ॥ जननीचे पोटीं उपजलासी जेव्हां ।
चिंता तुझी तेव्हां केली तेणें ॥ २ ॥ चातकांलागूनि मेघ
नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवीं ॥ ३ ॥ पक्षी वनचरे
आहेत भूमीवरी । तयांलागी हरि उपेक्षीना ॥ ४ ॥ तुका ह्मणे
भाव धरुनि राहें चित्तीं । तरि तो श्रीपति उपेक्षीना ॥ ५ ॥

  २६३ गर्भी असतां बाळा । कोण पाळी त्याचा लळा ॥ १ ॥
कैसा लाघवी सूत्रधारी । कृपाळुवा माझा हरी ॥ २ ॥
सर्प पिली विताच खाय । वांचलिया कोण माय ॥ ३ ॥
गगनीं लागला कोसेरा । कोण पुरवी तेथे चारा ॥ ४ ॥
पोटीं पाषाणांचे जीव । कवण जीव त्याचा भाव ॥ ५ ॥
तुका ह्मणे निश्चळ राहें । होईल ते सहज पाहे ॥ ६ ॥

  २६४. अभयाचे स्थळ । तें हैं एक अचळ ॥ १ ॥
तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ २ ॥ पुरली
आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥ ३ ॥ तुका ह्मणे कंठीं
नाम । अंगीं भरलेंसे प्रेम ॥ ४ ॥

  २६५. ह्मणउनि शरण जावें । सर्वभावें देवासी ॥ १ ॥
तो हा उतरील पार । भवदुस्तर नदीचा ॥ २ ॥ बहु आहे
करुणावंत । अनंत हे नाम ज्या ।। ३ ॥ तुका ह्मणे साक्षी
आलें । तरी केलें प्रगट ॥ ४ ॥

___________________________________________

१ पक्षी विशेष.