पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



६१

  २५२. आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा
उदारा पांडुरंगा ॥ १ ॥ देह हे काळाचे धन कुबेराचें । तेथे
मनुष्याचे काय आहे ॥ २ ॥ देता देवविता नेता नेवविता। |
तेथे याची सत्ता काय आहे ॥ ३ ॥ निमित्याचा धणी केला
असे प्राणी । माझे माझे म्हणोनि व्यर्थ गेला ॥ ४ ॥ तुका
ह्मणे कां रे नाशवंतासाठीं । देवासवें आटी पाडितोसी ॥ ५ ॥

  २५३. आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार
घालू नये ॥ १ ॥ मग तो कृपासिंधु निवारी सांकडें । येर
ते बापुडे काय रंक ॥ २ ॥ भयाचिये पोट दुःखाचियां
राशीं । शरण देवासी जातां भलें ।। ३॥ तुका म्हणे नव्हे
काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्वंभर ॥ ४ ॥

  २५४. हेचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी
माया संसाराची ।। १ ॥ ठेविले अनंते तैसेचि राहावें ।
चित्तीं असो द्यावें समाधान ॥२॥ वाहिल्या उद्वेग दुःखचि
केवळ । भोगणे ते फळ संचिताचें ॥ ३ ॥ तुका ह्मणे घालू
तयावरी भार । वाहू हा संसार देवांपाय ॥ ४ ॥

  २५५. अनंता जीवांचीं तोडिलीं बंधनें । मजहि येणे
काळे कृपा कीजे ॥ १ ॥ अनंत पवाडे तुझे विश्वंभरां ।
भक्त करुणाकरा नारायणा ॥ २ ॥ अंतरींचे कळों देई गुह्य
गुज । अंतरीं तें बीज राखईन ॥ ३ ॥ समदृष्टी तुझी पाहेन
पाउलें । धरीन संचले हृदयांत ॥ ४ ॥ तेणे या चित्ताची
राहेल तळमळ । होतील शीतल सकळ गावें ॥ ५ ॥ तुका
ह्मणे शांति करील प्रवेश । मग नव्हे नाश अखंड तो ॥ ६ ॥

________________________________________

१ सोडावी. २ ह्या काळीं, आतां