पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



६०

सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥ ३ ॥
भोगित्यासी काज अंतरींचे गोड । बाहिरल्या चाड नाहीं
रंगें ॥ ४ ॥ तुका ह्मणे भाव शुद्ध हे कारण । भाट नारायण
होईल त्यांचा ॥ ५ ॥

  २४८. लापनिक शब्दे नातुडे हा देव । मनिंचे
गुह्यभाव शुद्ध बोला ॥ १ ॥ अंतरिचा भेद जाणे परमानंद ।।
जयासी संवाद करणे लागे ॥ २ ॥ तुका ह्मणे जरी
आपुलें स्वहित । तरी करीं चित्त शुद्धभावें ॥ ३ ॥

  २४९. कायावाचामने झाला विष्णुदास । काम क्रोध
त्यास बाधीतना ॥ १ ॥ विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता ।
सकळ भोगिता होय त्याचे ॥ २ ॥ तुका ह्मणे चित्त करावें
निर्मळ । येउनि गोपाळ राहे तेथे ॥ ३ ॥

_____
३१. देवाच्याठायीं विश्वास.

  २५०. पक्षीयांचे घरीं नाहीं सामुगरी । त्यांची चिंता
करी नारायण ॥ १ ॥ अजगर जनावर वारुळांत राहे ।
त्याजकडे पाहे पांडुरंग ॥ २ ॥ चातक हा पक्षी ने घे
भूमिजळ । त्यासाठीं घननीळ नित्य वर्षे ॥ ३ ॥ तुका ह्मणे
आह्मी पिपीलिकांची जात । पुरवीं मनोरथ पांडुरंगा ॥ ४ ॥


  २६१. देव सखा जरी । जग अवघे कृपाकरी ॥ १ ॥
ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ २ ॥ देवाची
जतन । त्यासी बाधुं न शके अग्न ॥ ३ ॥ तुका ह्मणे हरी ।
प्रल्हादासी यत्न करी ॥ ४ ॥

_______________________________________________

१ जतन - ईश्वराने ज्याचे रक्षण केले आहे.
२ प्रल्हादाचे रक्षण करण्याकरितां ईश्वराने अनेक प्रयत्न केले.