पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८


  २३९. गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवें
भेटी केली तेणें ।। १ ।। सहज गुण जयाचिये देहीं । पालट
ते कांहीं नव्हे तया ॥ २ ॥ माकडाचे गळां मोलाचा तो
मणि । घातला चावुनी टाकी थुकोनि ॥ ३ ॥ तुका ह्मणे
खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ॥ ४ ॥

  २४०. न सांगावें वर्म । जनीं असों द्यावा भ्रम ॥ १ ॥
उगीच लागतील पाठीं । होती रितींच हिंपुटीं ॥ २ ॥
शिकविल्या गोष्टी । शिकोन न धरिती पोटीं ॥ ३ ॥
तुका ह्मणे शीण । होईल अनुभवाविण ॥ ४ ॥

  २४१. पाया जाला नारू । तेथें बांधला कापुरू। तेथें
बिबव्याचें काम । अधमासी तो अधम ॥ १ ॥ रुसला
गुलाम । धणी करीतो सलाम । तेथें चाकराचे काम ।
अधमासी तों अधम ।। २ ।। रुसली घरची दासी । धणी
समजावी तियेसी । तेथे बटकींचे काम । अधमासी तों
अधम ॥ ३ ॥ देव्हाऱ्यावरी विंचू आला । देवपूजा नावडे
त्याला । तेथें पैजारेचें काम । अधमासी तों अधम ॥ ४ ॥
तुका ह्मणे जाती । जातीसाठीं खाती माती ॥ ५ ॥

  २४२. गंगा न देखे विटाळ । तेंचि रांजणींही जळ
॥ १ ॥ अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥ २ ॥
काय खंडिली भूमिका । वर्णा पायरिकां लोकां ॥ ३ ॥
तुका ह्मणे अगीवीण । बीजे वेगळीं तों भिन्न ॥ ४ ॥

_________________________________________

१ लहान आणि मोठे ह्यांची बरोबरी नाहीं. भेदाच्या ठायींच
विटाळ असतो. भेदभाव विटाळाचे मूळ. धान्य विस्तवांत
घातलें कीं सर्वच राख अथवा शिजविलें कीं एकच रस;
मग भेदाचें नांव नाहीं