पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५७

  २३५. जेणें घडे नारायणी अंतराय । होत बाप माय
वर्जावीं तीं ॥ १ ॥ येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती
ती दुःखा पात्र शत्रु ॥ २ ॥ प्रल्हादें जनक बिभीषणे बंधु ।
राज्य माता निंदु भरतें केली ॥ ३ ॥ तुका ह्मणे सर्व धर्म
हरिचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥ ४ ॥

  २३६. साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी । तयासी
शेवटीं करबाडें ॥ १ ॥ मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें ।
तयांलागीं कांटे भक्षावया ॥ २ ॥ वाउगा हा धंदा आशा
वाढविती । बांधोनियां देती यमा हातीं ॥ ३ ॥ ज्यास असे
लाभ तोचि जाणे गोडी । येर ती बापुडी शिणली वांयां ॥ ४ ॥

  २३७. कै वाहावें जीवन । कै पलंगीं शयन ॥ १ ॥
जैसी जैसी वेळ पडे । तैसे तैसे होणे घडे ॥ २ ॥ कैं
भोज्य नानापरी । कैं कोरड्या भाकरी ॥ ३ ॥ कैं बसावें
वाहनीं । कैं पायीं अनवाणी ॥ ४ ॥ कैं उत्तम प्रावणे
कैं वसने तीं जीणें ॥ ५ ॥ कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें
विपत्ती ॥ ६ ॥ कैं सज्जनाशी संग । कै दुर्जनाशीं योग
॥ ७ ॥ तुका ह्मणे जाण । सुख दुःख ते समान ॥ ८ ॥

 २३८. नव्हे ब्रह्मज्ञान बोलतां हे सिद्ध । जंव हा
आत्मबोध नाहीं चित्तीं ॥ १ ॥ काय करिसी वांयां
लटिकाचि पाल्हाळ । श्रम तो केवळ जाणिवेचा ॥ २ ॥ मीच
देव ऐसे सांगसी या लोकां । विषयांच्या सुखा टोकोनियां
॥ ३ ॥ अमृताची गोडी पुढिलां सांगसी । आपण उपवासी
मरोनियां ॥ ४ ॥ तुका ह्मणे जरि राहील तळमळ । ब्रह्म
ते केवळ सदोदित ॥ ५ ॥

________________________________________

१ ईच्छा धरून.