पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५६

आशापाश माझी तोडीं माया चिंता । तुजविण व्यथा
नको कांहीं ॥ ५ ॥ तुका ह्मणे सर्व भाव तुझे पायीं ।
राहे ऐसे देई प्रेम देवा ॥ ६ ॥

  २३०. माझी आतां लोक सुखें निंदा करू । ह्मणती
विचारू सांडियेला ॥ १ ॥ कारण होय तो करावा विचार ।
काय भीड भार करूं देवा ॥ २ ॥ तुका ह्मणे काय करू
लापनिक । जनाचार सुख नासिवंत ॥ ३ ॥

  २३१. मान अपमान गोवें । अवधे गुंडूनि ठेवावें
॥ १ ॥ हेंचि देवाचे दर्शन । सदा राहे समाधान ॥ २ ॥
शांतीची वसती । तेथे खुटे काळगती ॥ ३ ॥ आली
ऊर्मी साहे । तुका ह्मणे थोडे आहे ॥ ४ ॥

  २३२. योगाचे ते भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रिये
॥ १ ॥ अवघीं भाग्ये येती घरा । देव सोयरा जालिया
॥ २ ॥ मिरासीचे ह्मणू सेत । नाहीं देत पीक उगें ॥ ३ ॥
तुका ह्मणे उचित जाणां । उगीं शिणा काशाला ॥ ४ ॥

  २३३. धांई अंतरिच्या सुखें । काय बडबड वाचा
मुखें ॥ १ ॥ विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभव
गोडी ॥ २ ॥ वाढे तळमळ उभयतां । नाहीं देखिले
अनुभवितां ॥ ३ ॥ आपुल्या मते पिसें । परि ते आहे
जैसेंतैसें ॥ ४ ॥ साधनाची सिद्धि । मौन करा स्थिर बुद्धि
॥ ५ ॥ तुका ह्मणे वादें । वांयां गेलीं ब्रह्मवृंदें ॥ ६ ॥

  २३४. अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझे
त्यास तेंचि द्यावें ॥ १ ॥ मुंगीवरी भार गजाचे पाळण ।
घालितां ते कोण कार्यसिद्धि ॥ २ ॥ तुका ह्मणे फांसे
वाघुरा कुऱ्हाडी । प्रसंगी तो काढी पारधी तों ॥ ३ ॥