पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५२

विष मेळवण विष होय ॥ २ ॥ सोने शुद्ध नेणे कोण हा
विचार । डांकें हीनवर केले त्यासी ॥ ३ ॥ याती शुद्ध परी
अधम लक्षण । वांयां गेलें तेणे सोंगेही ते ॥ ४ ॥ तुका म्हणे
शूर तोचि पावे मान । आणीक मंडण भारवाही ॥ ५ ॥

  २१४. चित्ता ऐसी नको देऊ आठवण । देवाचे
चरण अंतरे ते ॥ १ ॥ आलिया वचनें रामनामध्वनि ।
ऐकावीं कानीं ऐसी गोडें ॥ २ ॥ मत्सराचा ठाव शरीरी
नसावा । लाभेविण जीवा दुःख देतो ॥ ३ ॥ तुका म्हणें
राहे अंतर शीतळ । शांतीचे तें बळ क्षमा अंगीं ॥ ४ ॥

  २१५. भिक्षापात्र अवलंबणें । जळो जिणे लाजिरवाणे ।
ऐसियासी नारायणें । उपेक्षीजे सर्वथा ॥ १ ॥ देवा पायीं
नाहीं भाव । भाक्ति वरी वरी वाव । समर्पिला नाहीं जीव ।
जाणावा हा व्यभिचार ॥ २ ॥ जगा घालावें सांकडें । दीन
होऊनि बापुडें । हेंचि अभाग्य रोकडें । मूळ आणि अविश्वास
॥ ३ ॥ काय न करी विश्वंभर । सत्य करितां
निर्धार । तुका ह्मणे सार । दृढ पाय धरावे ॥ ४ ॥

  २१६. धनवंतालागीं । सर्वमान्यता आहे जगीं ॥ १ ॥
माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥ २ ॥ जंव
मोठा चाले धंदा । तंव बहिण ह्मणे दादा ॥ ३ ॥ सदा
शंगारभूषणें । कांता लवे बहुमानें ॥ ४ ॥ तुका ह्मणे
धन । भाग्य अशाश्वत जाण ॥ ५ ॥

  २१७. भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त ॥ १ ॥
तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाय ॥२॥