पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



५०

  २०५. साधकाची दशा उदास असावी । उपाधि
नसावी अंतर्बाहीं ॥ १ ॥ लोलुपता काय निद्रेसी जिंकावें ।
भोजन करावें परिमित ॥ २ ॥ एकांत लोकांशी स्त्रियांशी
भाषण । प्राण गेल्या जाण बोलों नये ॥ ३ ॥ संग
सज्जनांचा उच्चार नामाचा । घोष कीर्तनाचा अहर्निशी
॥ ४ ॥ तुका ह्मणे ऐशा साधन जो राहे । तोचि ज्ञान
लाहे गुरुकृपा ॥ ५ ॥

  २०६. महारासी शिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥ १ ॥
तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ २ ॥
नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥ ३ ॥ ज्याचा
संग चित्तीं । तुका ह्मणे तो त्या याती ॥ ४ ॥

  २०७. कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड
॥ १ ॥ कैंचा राम अभागिया । करी बडबड वांयां ॥ २ ॥
स्मरणाचा राग । क्रोधे विटाळले अंग ॥ ३ ॥ तुका ह्मणे
जडा | काय चाले त्या दगडा ॥ ४ ॥

  २०८. अर्थेविण पाठांतर कासया करावें । व्यर्थचि
मरावे घोकूनियां ॥ १ ॥ घोकूनियां काय वेगीं अर्थ पाहे ।
अर्थरूप राहे होऊनियां ॥ २ ॥ तुका ह्मणे ज्याला अर्थी
आहे भेटी । नाहीं तरी गोष्टी बोलों नका ॥ ३ ॥

  २०९. कुचराचें श्रवण । गुणदोषांवरी मन ॥ १ ॥
असोनियां नसे कथे । मूर्ख अभाग्य ते तेथें ॥ २ ॥

__________________________________________

१ चांडाळ -ज्याला स्पर्श करता येत नाही असा चांडाळ
जो राग त्याच अंतर्यामी त्याला विटाळ होतो.
२ नुसते घोकून काय लवकर अर्थ कळणार आहे ?