पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४९


  २०१. अन्नाच्या परिमळे जरि जाय भूक । तरि कां
हे पाक घरोघरीं ॥ १ ॥ आपुलालें तुह्मी करा रे स्वहित ।
वाचे स्मरा नित्य राम राम ॥ २ ॥ देखोनि जीवन जरी
जाय तान । तरी कां सांठवण घरोघरीं ॥ ३ ॥ देखोनियां
छाया सुख न पवीजे । जंव न बैसीजे तया तळीं ॥ ४ ॥
हित तरी होय गातां अईकतां । जरि राहे चित्ता दृढ
भाव ॥ ५ ॥ तुका ह्मणे होसी भावेंचि तू मुक्त । काय
करिसी युक्त जाणिवेची ॥ ६ ॥

२०२. निरोधाचे मज न साहे वचन । बहु होतें मन
कासावीस ॥ १ ॥ ह्मणऊन जीवा न साहे संगति ।
बैसतां एकांती गोड वाटे ॥ २ ॥ देहाची भावना वासनेचा
संग । नावडे उबग आला यांचा ॥ ३ ॥ तुका ह्मणे
देव अंतरे यामुळे । आशामोहजाळे दुःख वाढे ॥ ४ ॥

  २०३. आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं
नाश आयुष्याचा ॥ १ ॥ सकळांच्या पायां माझें दंडवत ।
आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ २ ॥ हित ते करावे देवाचे
चिंतन । करूनियां मन एकविध ॥ ३ ॥ तुका ह्मणे हित
होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥ ४ ॥

  २०४. बोलिलों तें कांहीं तुमचिया हिता । वचन
नेणतां क्षमा कीजे ॥ १ ॥ वाट दावी तया न लगे
रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥ २ ॥ निंब दिला रोग
तुटाया अंतरीं । पोभाळितां वरी आंत चरे ॥ ३ ॥ तुका
ह्मणे हित देखण्यासी कळे । पडती अंधळे कुपामाजीं ॥ ४ ॥

________________________________________

१ ज्ञानाच्या युक्तीस काय करतोस ? २ विरोधाचें. ३ चोळितां.