पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४८

अमृतपान । करूनी प्राशन बैसावें गा ॥ ३ ॥ आपुल्या मस्तकीं
पडोत डोंगर । सुखाचें माहेर टाकू नये ॥ ४ ॥ तुका ह्मणे
आतां सांगू तुला किती । जिण्याची फजिती करूं नये ॥ ५ ॥

  १९८. सत्य आह्मां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी
॥ १ ॥ ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टाका मळ
॥ २ ॥ देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढे व्हावयासी बरें ॥ ३ ॥
तुका ह्मणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें ॥ ४ ॥

  १९९. थोर ती गळाली पाहिजे अहंता । उपदेश
घेतां सुख वाटे ॥ १ ॥ व्यर्थ भराभर केले पाठांतर ।
जोंवरि अंतर शुद्ध नाहीं ॥ २ ॥ घोडे काय थोडे वागविते
ओझें । भावाविणा तैसें पाठांतर ॥ ३ ॥ तुका ह्मणे
धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो ॥ ४ ॥

  २००. वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य । न करिती
विचार कां हिताचा ॥ १ ॥ कोण दम ऐसा आहे यांचे
पोटीं । येईल शेवटीं कोण कामा ॥ २ ॥ काय मानुनियां
राहिले निश्चिती । काय जाब देती यमदूतां ॥ ३ ॥ कां
ही विसरलीं मरण बापुडीं । काय यांसी गोडी लागलीसे
॥ ४ ॥ काय हातीं नाहीं करील तयासी । काय जालें
यांसी काय जाणों ॥ ५ ॥ कां हीं नाठविती देवकीनंदना ।
सुटाया बंधनापासूनियां ॥ ६ ॥ काय मोल यांसी लागे
धन वित्त । कां हे यांचे चित्त घेत नाहीं ॥ ७ ॥ तुका ह्मणे
कां हीं भोगितील खाणी । कां त्या चक्रपाणी विसरलीं ॥ ८ ॥

_______________________________________

१ आयुष्याची.