पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
 ४५


  १८६ . सिंचन करितां मूळ । वृक्ष ओलावे सकळ ॥ १ ॥
नको पृथकाचे भरीं । पड़ों एक मूळ धरीं ॥ २ ॥
पाणचोऱ्याचें दार । वरिल दटावें ते थोर ॥ ३ ॥ वश झाला
राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥ ४ ॥ एक चिंतामणी ।
फिटे सर्व सुखधणी ॥ ५ ॥ तुका ह्मणे धांवा । आहे
पंढरीं विसांवा ॥ ६ ॥

  १८७. कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा
इच्छितिया ॥ १ ॥ उदंड त्या गाई म्हैसी आणि शेळ्या ।
परि त्या निराळ्या कामधेनु ॥ २ ॥ तुका ह्मणे देव दाखवील
दृष्टी । तयासवें भेटी थोर पुण्य ॥ ३ ॥

  १८८. कठिण नारळाचे अंग । बाहेरी भीतरी ते चांग
॥ १ ॥ तैसा करीं कां विचार । शुद्ध कारण अंतर ॥ २ ॥
वरि कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥ ३ ॥
ऊस बाहेरी कठिण काळा । माजी रसाचा जिव्हाळा ॥ ४ ॥
मिठे रुचविलें अन्न । नये सतत कारण ॥ ५ ॥

  १८९. बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहती ॥ १ ॥
वांयां गेलें ऐसें दिसें । लाभ त्याचे अंगीं वसे ॥ २ ॥
पाल्याची जतन । तरी प्रांतीं येती कण ॥ ३ ॥ तुका ह्मणे
आळा । उदक देतां लाभे फळा ॥ ४ ॥

____________________________________________

१ फुटक्या मडक्याचे दार ह्मणजे तोंडच बंद केले तर सर्व छिद्रे
आपोआप बंद होतात. २ एक चिंतामणी जवळ असला कीं सर्व
प्रकारचे सुख पूर्ण प्राप्त होते. ३ रुईचे झाड. ४ इच्छा करणारास,
५ रसभरित रसाळ. ६ मिठाने अन्नाला रुचि येते परंतु ते स्वतंत्र
करितां नये; स्वतंत्रपणे त्यास गोडी नाहीं.