पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३९

  १५७. ऐसे संत झाले कळीं । तोंडी तमाखूची नळी
॥ १ ॥ स्नानसंध्या बुडविली । पुढे भांग वोडवली ॥ २ ॥
भांगभुर्का हे साधन । पचनीं पडे मद्यपान ॥ ३ ॥ तुका
ह्मणे अवघे सोंग । तेथे कैंचा पांडुरंग ॥ ४ ॥

  १५८. ऐसे नाना भेष घेउनि हिंडती। पोटासाठी घेती
प्रतिग्रह ॥ १ ॥ परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांग
पां साचार नांव त्याचें ॥ २ ॥ जन्मतां संवसार त्यजियेला
शुकें । तोचि निष्कळंक तुका ह्मणे ॥ ३ ॥

  १५९. टिळा टोपी उंच दावी । जगीं मी एक गोसावी
॥ १ ॥ अवघा वरपंग सारा । पोटी विषयांचा थारा ॥ २ ॥
मुद्रा, लावितां कोरोनी । मान व्हावयासी जनीं ॥ ३ ॥
तुका ह्मणे ऐसे किती । नरका गेले पुढे जाती ॥ ४ ॥

  १६०. डोई वाढवूनि केश । भूते आणिती अंगास
॥ १ ॥ तरी ते नव्हती संतजन । तेथें नाहीं आत्मखुण
॥ २ ॥ मेळवूनि नरनारी । शकुन सांगती नानापरी ॥ ३ ॥
तुका ह्मणे मैंद । नाहीं त्यापाशीं गोविंद ॥ ४ ॥

  १६१. दाढी डोई मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरती बरव
वस्त्र काळे ॥ १ ॥ उफराटी काठी घेउनियां हातीं । उपदेश
देती सर्वत्रांसी ॥ २ ॥ चाळवुनि रांडा देउनियां भेष ।
तुका ह्मणे त्यास यम दंडी ॥ ३ ॥

  १६२. सांगों जाणती शकून । भूत भविष्य वर्तमान
॥ १ ॥ त्यांचा आह्मांसी कंटाळा । पाहों नावडती डोळां
॥ २ ॥ रिद्धिसिद्धींचे साधक। वाचासिद्ध होती एक ॥ ३ ॥
तुका ह्मणे जाती । पुण्यक्षयें अधोगती ॥ ४ ॥