पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२९


ऐसे आवडते मना । देवा पुरवावी वासना ॥ २ ॥
हरिजनासी भेटी । नहो अंगसंगें तुटी ॥ ३ ॥ तुका ह्मणे
जिणें । भलें संतसंघट्टणें ॥ ४ ॥

  ११५. वैराग्याचे भाग्य । संतसंग हाचि लाभ ॥ १ ॥
संतकृपेचे हे दीप । करी साधका निष्पाप ॥ २ ॥ तोचि
देवभक्त । भेदाभेद नाहीं ज्यास ॥ ३ ॥ तुका प्रेमें नाचे
गाये । गाणियांत विरोन जाये ॥ ४ ॥

  ११६. नव्हती ते संत करितां कवित्व । संतांचे ते
आप्त नव्हती संत ॥ १ ॥ येथे नाहीं वेश सरत आडनांवे ।
निवडे घावडाव व्हावा अंगीं ॥ २ ॥ नव्हती ते संत
धरितां भोपळा । करितां वाकळा प्रावरण ॥ ३ ॥
नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराणे नव्हती
संत ॥ ४ ॥ नव्हती ते संत वेदाच्या पठणें । कर्म आचरणें
नव्हती संत ॥ ५ ॥ नव्हती संत करितां तप तीर्थाटण ।
सेविलिया वन नव्हती संत ॥ ६ ॥ नव्हती संत
माळामुद्रांच्या भूषणें । भस्मउद्धूळणे नव्हती संत ॥ ७ ॥ तुका
ह्मणे नाहीं निरसला देहे । तो अवघे हे संसारिक ॥ ८ ॥

  ११७. जिचे पीडे बाळ । प्राण तियेचा विकळ ॥ १ ॥
ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव ॥ २ ॥
सुखाची विश्रांती । उमटे मातेचिये चित्तीं ॥ ३ ॥ तुका
ह्मणे संत । तुह्मीं बहु कृपावंत ॥ ४ ॥

____________________________________________

१ शिष्य. २ येथे वेष, आडनांव सरत नाहीं, चालत नाहीं. घाव 

निवडतो, डाव निवडतो. घाव डाव ह्या कसोटीने संत निवडला
जातो. ३ फाटका कांबळा, ४ भस्म लावणे. ५ विव्हळ.