पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२८


  ११०. हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं
॥ १ ॥ तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ २ ॥
मोहरा तोचि अंगें । सूत न जळ ज्याचे संगें ॥ ३ ॥
तुका ह्मणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥ ४ ॥

  १११. काय वाणू आतां न पुरे हे वाणी । मस्तक
चरणीं ठेवीतसें ॥ १ ॥ थोरीव सांडिली आपुली परिसें ।
नेणे शिवों कैसें लोखंडासी ॥ २ ॥ जगाच्या कल्याणा
संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥ ३ ॥ भूतांची
दया हें भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥ ४ ॥
तुका ह्मणे सुख पराविया सुखें । अमृत हे मुखें स्रवतसे ॥ ५ ॥

  ११२. संतांचिया गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं
तळमळ दुःखलेश ॥ १ ॥ तेथे मी राहीन होऊनि याचक ।
घालितील भीक तेचि मज ॥ २ ॥ संतांचिया गांवीं वैरो
भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥ ३ ॥ संतांचे भोजन
अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥ ४ ॥ संतांचा
उदीमें उपदेशाची पेंठ । प्रेमसुख साटीं घेती देती ॥ ५ ॥
तुका ह्मणे तेथे आणिक नाहीं परी । ह्मणोनि भिकारी
झालो त्यांचा ॥ ६ ॥

  ११३. लेंकराचे हित । वाहे माउलीचे चित्त ॥ १ ॥
ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ॥ २ ॥
पोटी भार वाहे । त्याचे सर्वस्वही साहे ॥ ३ ॥ तुका ह्मणे
माझे । तैसें तुह्मां संतां ओझें ॥ ४ ॥

  ११४. देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥ १ ॥


____________________________________________


१ हातोडा, २ खोट्याचा. ३ अमित, ४ व्यापार, ५ बदला.