पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२७


संत बोलती वचन ॥ ४ ॥ सूर्याचिया परी तुका लोकीं
क्रीडा करी ॥ ५ ॥

_____


२४. संत अथवा सञ्जन.

  १०६. चंदनाचे हात पायही चंदन। परिसा नाहीं
हीन कोणी अंग ॥ १ ॥ दीपा नाहीं पाठी पोटीं अंधकार ।
सर्वांगें साकर अवघी गोड ॥ २ ॥ तुका ह्मणे तैसा
सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळेची ना ॥ ३ ॥

  १०७. काय सांगों आतां संतांचे उपकार । मज
निरंतर जागविती ॥ १ ॥ काय द्यावें त्यांसी व्हावें उतराई ।
ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ २ ॥ सहज बोलणे हित
उपदेश । करूनि सायास शिकविती ॥ ३ ॥ तुका ह्मणे
वत्स धेनुवेच्या चित्तीं । तैसे मज येती सांभाळीत ॥ ४ ॥

  १०८. जे कां रंजले गांजले । त्यांसि ह्मणे जो आपुले
॥ १ ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेच जाणावा ॥ २ ॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥ ३ ॥ ज्यासि
आपंगिता नाहीं । त्यासि धरी जो हृदयीं ॥ ४ ॥ दया
करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।। ५ ।। तुका
ह्मणे सांगू किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥ ६ ॥

  १०९. अर्भकाचे साठीं । पंते हातीं धरिली पाटी
॥ १ ॥ तैसे संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंग ॥ २ ॥
बाळकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥ ३ ॥
तुका ह्मणे नाव । जनासाठी उदकीं ठाव ॥ ४ ॥

________________________________________

१ सांभाळणारा. २ बालक, ३ पंतोजीने