पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२०


हा तो अनुभव रोकडा । कळों येतो खरा कुडा ॥ २ ॥
तोडिलिया बळे । वांयां जाती काची फळे ॥ ३ ॥ तुका
ह्मणे मन । तेथे सकळ कारण ॥ ४ ॥

  ७६. जवळी नाहीं चित्त । काय मांडियलें प्रेत ॥ १ ॥
कैसा पाहे चर्मदृष्टी । दीप स्नेहाच्या शेवटीं ॥ २ ॥
कांतेंलेंसे श्वान । तैसें दिशा हिंडे मन ॥ ३ ॥ त्याचे कानीं
हाणे । कोण बोंब तुका ह्मणे ॥ ४ ॥

  ७७. अवघ्या उपचारा । एक मनचि दातारा ॥ १ ॥
घ्यावीघ्यावी हेचि सेवा । माझी दुर्बळाची देवा ॥ २ ॥
अवघियाचा ठाव । पायांवरी जीवभाव ॥ ३ ॥ चित्ताचें
आसन । तुका करितो कीर्तन ॥ ४ ॥

  ७८. होउं नको कांहीं या मना आधीन । नाइकें
वचन याचें कांहीं ॥ १ ॥ हटियाची गोष्टी मोहून टाकावी ।
सोई ही धरावी विठोबाची ॥ २ ॥ आपुले आधीन
करूनियां ठेवा । नाहीं तरी जीवा घातक हें ॥ ३ ॥ तुका ह्मणे
जाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥ ४ ॥

  ७९. काय करूं सांगतांहीं न कळे वर्म । उपस्थित
भ्रम उपजवितो ॥ १ ॥ मन आधीं ज्याचें आलें होईल
हाता । तयावरी सत्ता केली चाले ॥ २ ॥ अभुकेचे
अंगीं चवी ना सवाद । मिथ्या ऐसा वाद दुराग्रह ॥ ३ ॥
तुका ह्मणे आप राखावें आपणा । संकोचोंचि कोणा नये
आतां ॥ ४ ॥

____

____________________________________________

१. दिवा विझाल्यावर. २ कांतवलेले, पिसाळलेले, ३ कोणी जरी त्याच्या कानाशी ओरडले तरी त्याला ऐकू जाणें नाहीं.